नागपूर जिल्हापरिषदेत शिवसेनेचा स्वबळाचा नारा

नागपूर : ३० जून – नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला उत्तर न दिल्यामुळे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे सेना, भाजप आणि आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव स्थानिक शिवसेनेने राष्ट्रवादीला दिला होता. मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला कोणतंही उत्तर दिलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 61 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी दिली. “कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे” असं आशिष जैसवाल यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असं चित्र पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply