मुंबई:२९ जून-१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्यामुळे अनिल देशमुख यांची धावाधाव सुरू आहे. अटक टाळण्यासाठी प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. करोनामुळे ऑनलाईन माध्यमातून आपला जबाब नोंदवणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास ईडीनं त्यांना सांगितलं होत. मात्र, आजही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आहे. मंगळवारी ईडीला लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी लिहिले की, मी जवळपास ७२ वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील समस्या आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. तपास करताना आणि जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला. म्हणूनच, आज स्वत: उपस्थित राहणे योग्य नाही व मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत आहे.
ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये वैयक्तिक स्वरुपातील उपस्थित राहावे लागेल, असे स्पष्ट केलेलं नाही असेही देशमुख यांनी म्हटले आहे.