नागपूर:२८ जून- आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या नाराजीमुळे १५० कार्यकर्त्यांसोबत आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी बसपामध्ये असताना ३० वर्षाच्या कार्यकाळात पक्षात वेगवेगळया पदावर काम केले होते. शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्त्वात त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
साखरे यांच्या पक्षप्रवेशानंतर इतर पदाधिकारी तसेच बसपाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतला. साखरे हे बसपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असताना २०१९च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्त्वात घेण्यात आल्या. पण ऐन निवडणुकीचा निकाल लागण्याच्या काही तासांपूर्वी पराभवाचे खापर फोडून तत्कालीन बसपाचे महाराष्ट्र प्रभारी विरसिंग यांनी चुकीची माहिती मायावती यांनी दिली. त्यामुळे मला पक्षातून काढून टाकले, असा आरोप साखरे यांनी केला. त्यानंतरही सामान्य कार्यकर्ता बनून राहिलो असतानाही मायावती यांनी बाजू ऐकून न घेतल्याने शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सुरेश साखरे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून साखरे यांना सेनेत प्रवेश देण्यात आला आहे. आगामी निवडणुका पाहता पक्षाची ताकद वाढण्यास नक्कीच मदत होईल, अशी माहिती आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी दिली.