डोळ्यात मिरचीपूड टाकून शिवसेना शहरप्रमुखाची केली धारदार शस्त्रांने हत्या

अमरावती: २७ जून- मित्रासोबत बारमध्ये दारू पिण्यास गेलेल्या शिवसेना शहरप्रमुखाची डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर पाच जणांनी शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक रिता ऊईके यांनी तातडीने तपास हाती घेत शनिवारी रात्री उशिरापर्यंत ४ आरोपींना अटक केली. तर, एक आरोपी फरार आहे.
शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख ३४ वर्षीय अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आली. तिवसा शहरातून जाणाऱ्या अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र, बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी पाच जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संदीप रामदास ढोबाळे (वय ४२), प्रविण रामदास ढोबाळे, प्रविण उर्फ अविनाश एकनाथ पांडे (वय ३०) आणि रुपेश घागरे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण तिवसा शहरातील रहिवासी आहेत.

Leave a Reply