लखनऊ: २७ जून-आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींबाबत, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आज रविवारी एक मोठी घोषणा केली. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा व एमआयएम यांच्या आघाडी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, त्यावर देखील मायावतींनी भूमिका स्पष्ट केली आहे. बसपा व एमआयएम यांच्यातील आघाडीबाबतच्या चर्चा संपूर्णपणे चुकीच्या आहेत, यामध्ये काहीच तथ्य नाही. असं मायावतींनी म्हटले आहे.
बसपा प्रमुख मायावतींनी यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार असल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे. यामध्ये काडीमात्रही सत्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडन करते.
दरम्यान, बसपाने, आता राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्र यांना बीएसपी सेलचे राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.