नागपूर: २६ जून- मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, आज शनिवारी भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. पुढच्या तीन-चार महिन्यात आपण ओबीसी आरक्षण परत आणू शकतो. खऱ्या अर्थाने आमच्या हाती सूत्र द्या. मी दाव्याने सांगतो, ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय सन्यास घेईन, अशी घोषणाच यावेळी फडणवीस यांनी केली. आंदोलनादरम्यान, फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नागपूर येथील व्हरायटी चौकात जमलेल्या आंदोलकांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे लोकांना कळलं पाहिजे. वाशिममधील काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी आरक्षणाच्या विरोधात याचिका केली होती, असं फडणवीस म्हणाले. या दोघांच्या याचिकेमुळंच ओबीसी आरक्षणाचं प्रकरण उच्च न्यायालयात गेलं.
राज्य सरकारने नाकर्तेपणाने मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं, असा हल्लाबोल त्यांनी राज्य सरकारवर केला. याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण देण्यासाठी सांगितलं आहे. या सरकारचं एक मस्त आहे, एकमेकांचे लचके तोडायला ते तयार आहेत, पण सत्तेचे लचके तोडतांना ते एक आहेत. जिथे हे पडले धडपडले, तिथे एका सूरात बोलतात की मोदींनी केलं पाहिजे! एखाद्या दिवशी यांच्या बायकोने यांना मारलं तर त्यालाही हे मोदींनाच जबाबदार ठरवतील. या देशाचे पंतप्रधान ओबीसीचे पुत्र नरेंद्र मोदी झाले, त्या दिवशी पहिल्यांदा संविधानात ओबीसींना जागा मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादीने ती नाही दिली. ओबीसीला या संविधानात आयोगाला जागा मिळाली आणि ओबीसीला संविधानिक करण्याचं काम जर कुणी केलं, असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं. जर मोदींचा संबंध असता, तर उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण का आहे? मध्य प्रदेशात, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये का आहे? देशाच्या प्रत्येक राज्यात ओबीसी आरक्षण शिल्लक आहे. तुमची १५ महिने पूर्ण होता-होता, केवळ महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण गेलं आहे. तुमचा यामध्ये काय डाव आहे हे आमच्या लक्षात येतं आहे, असंही फडणवीस म्हणाले.
आज या महाराष्ट्रात वडेट्टीवार ज्या खात्याचे मंत्री म्हणून मिरवतात, ते ओबीसी खातं काँग्रेस-राष्ट्रवादीने तयार केलेलं नाही. ओबीसींसाठी खातं आम्ही तयार केलं. त्यासाठी योजना तयार केल्या, त्याला निधी आम्ही दिला आणि मोठ्या प्रमाणात ओबीसींचं कल्याण झालं पाहिजे, हा प्रयत्न आमच्या काळात झाला, असे फडणवीस म्हणाले.