लागोपाठ घडलेल्या हत्यांमुळे नागपूर जिल्ह्यात दहशत

नागपूर : २५ जून – नागपुरात गेल्या चार दिवसात दहा जणांची हत्या झाल्याची माहिती मिळतेय. दिवसेंदिवस गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे क्राईम कॅपिटल अशी ओळख नागपूरची बनली आहे. गेल्या चार दिवसात झालेल्या दहा जणांच्या हत्येनं नागपूर जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. चार दिवसात दहा जणांची हत्या झाली आहे. या दहापैकी ८ हत्या नागपूर शहर तर दोन हत्या नागपूर जिल्ह्यातल्या कुही आणि उमरेड ग्रामीण भागात झाली आहे.
२० जून रोजी पहिली घटना
नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास शुभम ठवकर या ट्रक चालकाची हत्या झाली. दगड, विटा, फरशीनं शुभमची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. शोएब उर्फ जॉनी शाहिद शेख आणि विक्रांत ऊर्फ विकी महेंद्रसिंग चंदेल अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. मृत शुभम आणि शोएब हे दोघेही ट्रक चालक होते. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्याचाच राग मनात ठेवून आरोपींनी शुभमची हत्या केली.
२० जूनलाच दुसरी घटना
कुही तालुक्यातील मांगली शिवार येथे शेतावर काम करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. वकील ज्ञानेश्वर फुले हे त्यांच्या पत्नीसह शेतावर गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या शेतावर काम करणारा नरेंश कुरुडकरचा मृतदेह फार्महाऊसमध्ये सापडला. फुले यांच्या शेतावर काही दिवसांपूर्वी अविनाश नरुळे हा ट्रॅक्टरचालक काम करत होता. मात्र तो डिझेल चोरी करायचा म्हणून त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. अविनाशनं राकेश महाजन याच्यासोबत हात मिळवणी करुन नरेशची हत्या केल्याचं तपासात समोर आलं.
२१ जून रोजी तिसरी घटना
नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपत्तीच्या वादातून पुतण्या आणि त्याच्या पत्नीनं काकाची हत्या केली. नितीन निनावे आणि त्याची पत्नी माधुरी निनावे अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तर नामदेव लक्ष्मण निनावे असं मृत काकाचं नाव आहे. काका नामदेव आणि पुतण्या नितीन एकाच घरात राहायचे. संपत्तीवरून त्यांच्यात दररोज वाद व्हायचे. दोन दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात असाच वाद झाला. काकानं नितीनच्या मुलाची गळा आवळून हत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संतापलेल्या नितीनने काकांच्या डोक्यावर काठीनं वार करुन त्यांची हत्या केली
२१ जूनला चौथी घटना
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी आलोक मातूरकर यानंही आत्महत्या केली. आलोक हा टेलर होता. मेहुणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आलोकचे कुटुंब आणि मेहुणीच्या कुटुंबात वाद सुरु होते. आलोकनं आपल्या पत्नीसह दोन मुलांची आणि सासू, मेहुणीची हत्या केली. पहाटेच्या सुमारास आरोपी आलोकनं स्वतः देखील आत्महत्या केली.
२२ जून ला पाचवी घटना
योगेश धोंगडे या 30 वर्षीय तरुणाची अनैतिक संबंध असल्याचा संशय आणि जुगाराच्या जुन्या वादातून हत्या झाली. ही घटना नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजी नगर भागात घडली. स्थानिक गुंड गोलू धोटे याला योगेशचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून गुंड दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होता. घटनेच्या दिवशीचं गोलूने योगेशच्या घरावर देखील हल्ला केला. मात्र, योगेश पळून गेला. त्यानंतर गोलू आणि त्याच्या साथीदाराने योगेशला जवळच्या नाग नदीच्या पात्रात गाठलं आणि धारधार शस्त्राने त्याची हत्या केली.
२२ जूनला सहावी घटना
अक्षय लांडगे आणि त्याच्या साथीदारांनी शेषराव बनसोड या तरुणाची हत्या केली.जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत भीमसेना नगरात ही घटना घडली आहे. एक महिन्यांपूर्वी मृत शेषराव बनसोड आणि अक्षय लांडगे यांच्यात वाद झाला होता. याचाच राग मनात धरुन आरोपीनं बनसोड याची हत्या केली आहे. अक्षयविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली.

Leave a Reply