परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली

नागपूर : २५ जून – विविध मागण्यांसाठी परिचाराकांनी(नर्स) सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. परिचारिकांच्या संपामुळे नागपूरातील मेयो, मेडीकल आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमधील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्य सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
नागपूरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील शस्त्रक्रिया परिचारिकांच्या कामबंद आंदोलनामुळे काल सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन स्थगित करावे लागले होते. आज सुद्धा तीच परिस्थिती कायम असल्यामुळे सर्व ॲापरेशन पुढे ढकलण्यात येणार आहे. परिचारिकांच्या काम बंद आंदोलनामुळे मेडिकल प्रशासनाने १६ वार्ड बंद केले असून, कमी वार्डात दाटीवाटीने रुग्ण ठेवण्याची वेळ आलीय.
परिचारिकांची अनेक वर्षांपासून रिक्त पदे प्रलंबित आहेत. रिक्त पदे न भरल्याने कोरोना काळात रुग्णसेवा करताना परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदभरती सरकारने तात्काळ करावी. सोबतच केंद्र सरकारप्रमाणे कोविड भत्ता द्यावा. शिल्लक सुट्ट्यांचा प्रश्न यासारख्या मागण्यांसाठी नर्सेसनी सोमवार पासून आंदोलन सुरु केले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा. कोरोना काळात परिचारिकांना जोखीम भत्ता द्यावा. कोरोना रुग्णांच्या सेवेनंतर सात दिवस विलगीकरणात राहण्याची परवानगी द्यावी. पदनामात बदल करावा या मागण्या करत आहेत.

Leave a Reply