चंद्रपूर:२५ जून- चंद्रपूरमधील दाताळा नदीवरील नवनिर्मित पुलाला ‘रामसेतू’ नाव देण्याचा ठराव महानगरपालिकेने पारित केला आहे. ही मागणी चंद्रपूर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी केली होती.
दाताळा मार्गावरील या पुलाला ‘रामसेतू’ नाव देण्याच्या मागणीचे निवेदन सर्वप्रथम विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने देण्यात आले होते. या मागणीसाठी पाठपुरावाही करण्यात आला. दरम्यान, २३ जून रोजी पार पडलेल्या महानगरपालिकेच्या सभेत, राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पूलाला ‘रामसेतू’ असे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला. त्याबद्दल चंद्रपूर विश्व हिंद परिषद व बजरंग दलतर्फे सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत . ही मागणी विहिंपचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, कार्याध्यक्ष विनोद उपाध्याय, जिल्हा मंत्री विजय यंगलवार, जिल्हा संयोजक अमित करपे, नगर संयोजक तुषार चौधरी, सत्यनारायण सोनकर, राजेश यादव, यांच्यासह नगरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी केली होती.