चंद्रपूर: २५ जून- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आज शुक्रवार, २५ जूनपासून सुरू करण्यात येत असल्याचे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी माध्यमांना सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा या सर्व व्याघ्र प्रकल्पांना संरक्षित क्षेत्रात पर्यटन परवानगी मिळाली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असताना सुरक्षिततेचा उपाय म्हणून वन्यजीव पर्यटन बंद करण्यात आले होते. आता देश जवळजवळ ‘अनलॉक’ झाला आहे. महाराष्ट्र राज्यातही सारे काही पूर्वपदावर येत आहे. अशावेळी पर्यटन पूर्ववत सुरू करावे, या आशयाची ‘एनटीसीए’ची आणि आता राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांची परवानगी पर्यटकांना दिलासा देणारी आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या व्याघ्र प्रकल्पांत पर्यटकांची रेलचेल सुरू होईल. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीही आता उठली असल्याने ‘ताडोबा’ पर्यटनाकडे देश-विदेशातील पर्यटकांचा ओढा वाढणार असून, पर्यटनासंबंधीचा रोजगारही तेजीत असणार आहे.
राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्या पत्रानुसार, राज्यातील सुप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा या सर्व व्याघ्र प्रकल्पांना संरक्षित क्षेत्रात पर्यटन सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. कोरोनाच्या सर्व दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करून स्थानिक पातळीवर निर्णय घेत पर्यटन सुरू करावे, असे पत्रात म्हटले आहे.