अखेर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी हाताला घड्याळ बांधले

नागपूर : २५ जून – माजी केंद्रीय मंत्री आणि नागपूर जिल्ह्यातील माजी शिवसेना नेते सुबोध बाबुराव मोहिते यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.
सुबोध मोहिते हे सुरुवातीला शासकीय सेवेतील अधिकारी होते, महाडमध्ये नोकरी करत असताना महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ते रुजू झाले, शिवणकरांकडे काम करत असतानाच ते शिवसेनेच्या संपर्कात आले आणि १९९७ मध्ये शासकीय सेवेचा राजीनामा देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वर्षभरातच ते शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख झाले. १९९९ मध्ये ते शिवसेनेचे खासदार म्हणून रामटेकमधून विजयी झाले. २००३ मध्ये ते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून नियुक्त झाले होते. २००४ मध्येही ते पुन्हा रामटेकचे खासदार म्हणून विजयी झाले होते.
२००७ मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी न पटल्याने त्यांनी शिवसेनेचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
तेव्हापासून सुबोध मोहिते कुठेही निवडून येऊ शकले नाहीत. त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये अनुक्रमे काटोल आणि रामटेकमधून विधानसभेसाठी निवडणूक लढवली मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. नंतरच्या काळात काँग्रेसला कंटाळून त्यांनी काही काळ विनायक मेटेंचा ते काही काळ राजू शेट्टींचा हात पकडला होता. शेट्टींच्या सूचनेवरून त्यांनी वर्धेतून लोकसभा लढवण्याचीही तयारी सुरु केली होती मात्र, तिथेही त्यांची निराशाच झाली. परिणामी गेली सुमारे दीड वर्ष ते राजकीय व्हिजनवासातच होते दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपचे दरवाजे ठोठावले मात्र तिथे त्यांना यश आले नाही.
शेवटी त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांची शरद पवारांसोबत चर्चा झाल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी भवनात झालेल्या छोटेखानी समारंभात शरद पवारांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यादेखील उपस्थित होत्या.
सुबोध मोहिते हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कट्टर विरोधक मानले जातात. मोहिते राष्ट्रवादीत आल्यामुळे आता त्यांचे आणि देशमुखांचे संघर्ष होणार कि जुळवून घेणार हे काळच ठरवणार आहे.

Leave a Reply