शेतात नागिणीसह २० पिल्ले आढळली

भंडारा : २४ जून – पवनी तालुक्यातील आसगाव (चौ) गावात शेतामध्ये नागिणीसह २० पिल्ले आढळून आली. सेंद्री रोडवर असलेल्या शेतातील मीटर घरामध्ये उंदराच्या बिळात नागीण आणि तिची पिल्ले आढळली. ‘मैत्र’ ग्रुपचे सदस्य असलेल्या सर्पमित्रांनी त्यांना पकडून सुखरूप जंगलात सोडले.
पवनी तालुक्यातील आसगाव-सेंद्री रोडवरील किशोर काटेखाये यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुराला शेतातील मीटर घरामध्ये साप असल्याचे दिसले. त्यांनी लगेच शेत मालकास फोन करून माहिती दिली. काटेखाये यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र नामदेव मेश्राम यांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच शुभम ब्राम्हणकर या सहकाऱ्याला सोबत घेऊन नामदेव मेश्राम काटेखाये यांच्या शेतात हजर राहिले. त्यांनी मीटर घरात साप पकडण्याच्या प्रयत्न केला. यावेळी त्यांना एका मागून एक सापाची पिल्ले दिसली. सर्व पिल्ले बाहेर काढली. तेव्हा एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क नागिनीसह 20 पिल्ले आढळून आली. सोबतच एक धामण जातीचा सापसुद्धा आढळला. या सर्व सापांना मोठ्या शिताफीने पकडले. नागिणीला वेगळ्या डब्यात, तर सर्व पिल्लांना वेगळ्या डब्यात सुखरूप ठेवण्यात आले.
या सर्व सापांना सुखरूप पकडले. त्यात धामण हे बिनविषारी असल्याने शेतातील उंदीर, घुस व अन्य पिकाची नासाडी करणाऱ्या उपद्रवी किटकांना भक्ष करते. त्यामुळे साप हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे शेतमालकाला पटवून दिले. यानंतर धामणाला शेतातच सोडण्याची सहमती शेतकऱ्याने दिली. त्यानुसास, धामणाला शेतातच सोडण्यात आले.

Leave a Reply