वटसावित्री
उद्या वटपौर्णिमा काल पासूनच समाजमाध्यमांवर निरनिराळे मेसेज फिरायला सुरुवात झाली आहे. त्यातला मला खटकणारा एक मेसेज म्हणजे सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा सावित्रीबाई फुलेंचा मार्ग धरला तर उत्तम काहीतरी अशा अर्थाचा मेसेज. सावित्रीबाई फुलेंचे कार्य तर अनमोल आहेच त्याबद्दल वादच नाही पण कुणा एकाची स्तुती करतांना किंवा महत्व सांगतांना दुसऱ्यावर टिका केलीच पाहिजे कां ? कोणाला कमीपणा दिला तरच एखाद्याचे महत्व वाढते कां ?
काय जाणून घेतलं आपण सत्यवानाच्या सावित्री बाबत ? केवळ व्रत वैकल्य , सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाची पूजा करा , फेऱ्या घाला इतकच ?
सत्यवान सावित्री चे आख्यान महाभारताच्या वनपर्वात येते . मद्र देशाचा राजा अश्वपतीची रुपवान , गुणवान , बुद्धिमान अशी ही कन्या सावित्री. तर्कशुद्ध विचार मांडणारी , वादविवादात प्रवीण , स्वतंत्र विचाराची . अतिशय बुद्धिमान . ती उपवर झाली तेंव्हा अश्वपतीने तिला आपला वर निवडण्याची मुभा दिली. मी तर कुठे ऐकलं की तिच्या विद्वत्तेमुळे तिच्याशी विवाह करायला कोणी धजावेना.आपल्यापेक्षा बुद्धिमान बायको कोणालाच नको असते .आजही इतके पुढारलो म्हणताना हा विचार करतातच नाही कां ? " जास्त शिकलेली , जास्त पॕकेज असलेली मैत्रिण म्हणून चालते पण सहचारिणी म्हणून नाही. " अर्थात अपवादही असतातच.
तर सावित्रीला सत्यवान हा पती म्हणून पसंत पडला . द्युमत्सेन राजाच्या अंधत्वामुळे शत्रुंनी त्याचे राज्य हिरावून घेतले .त्या मुळे राजाला रानोमाळ भटकावे लागले . त्याचा पुत्र सत्यवान . अतिशय रुपवान त्याच बरोबर उदार , दानशूर , शूरवीर,मृदुभाषी असा सत्यवान निष्कांचन असून , त्याचा एका वर्षात मृत्यु होणार हे माहित होऊनही सावित्रीने त्याला पती म्हणून वरले . आपल्या निर्णयावर ठाम होती ती. नंतर जे जीवन वाट्याला आले ते आनंदाने स्वीकारले.
श्रेयस आणि प्रेयस यातून प्रेयसाच्या क्षणिक सुखा ऐवजी श्रेयसाच्या अंतिम शाश्वत सुखाचा पर्याय तिने निवडला.
सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी आलेल्या यमालाही आपल्या तर्कशुद्ध वाक्चातुर्याने विचार करायला लावला . यमाशी झालेल्या संवादातून तिची बुद्धीमत्ताच प्रकट होत नाही कां ? सत्यवानावरील उत्कट प्रेमामुळे , तिने स्वतः त्याला निवडलेले असल्याने त्याला वाचवायचा आटोकाट प्रयत्न तिने केला . अशा सावित्रीचा खरं तर स्त्रियांना अभिमानच वाटायला हवा.
सावित्रीला औषधीशास्त्राचेही पुरेपूर ज्ञान असावे. म्हणूनच तर सत्यवानाला विषारी वायू शोषून घेणाऱ्या आणि भरपूर प्राणवायू देणाऱ्या वटवृक्षाखाली आणले तिने .
आजच्या कोरोना काळात प्राणवायूचे महत्व सगळ्यांनाच पटले असावे . तेंव्हा यावर शंकाकुशंका घेणे योग्यच नाही oxygen concentrator च म्हणा त्याला हवं तर.
सावित्रीबाई फुलेंना अनुसरुन शिक्षणाची कास धरणे हे तर बरोबरच आहे. ते करायलाच हवे . पण शिक्षणाचा प्रसार हा काही आजच , आधुनिक काळात झाला असे नाही. आपल्या सनातन संस्कृतीत स्त्री शिक्षणाला तेंव्हाही महत्व होतच हे कसे विसरता ? अनेक विदुषींची उदाहरणे निरनिराळ्या आख्यानात येतात.
मध्यंतरी सुलतानी आक्रमणांमुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी बंधनं घालावी लागली असतील आणि पुरुषप्रधान संस्कृती मुळे ती कायम राहिली , जाचक झाली. पण आपली संस्कृती अनिष्ट रुढी , परंपरांचा त्याग करुन निरंतर नवे विचार , बदल स्वीकारणारी आहे . जेंव्हा एखादा चांगले कथन धार्मिक कर्मकांडांशी जोडले जाते तेंव्हा त्यातला चांगला विचार, कथेचे सार हा विचारवंतांचा प्रांत असल्याने तो बाजूला राहून बाकीच्या सोयिस्कर बाबींवरच भर दिला जातो.
आपली संस्कृती मुळात निसर्गपूजक. सगळ्या वनस्पतींचे संरक्षण , संवर्धन होईल या कडे लक्ष पुरवणारी . आपण त्याचा मूळ आत्माच हरवून बसलो आहोत. सगळ्या व्रतांचे सार जाणून त्याप्रमाणे वागलो असतो तर पर्यावरणाच्या नावाने गळे काढायची वेळ आली नसती.
आजच्या आधुनिक युगात तर वटपौर्णिमेच्या व्रताची यथेच्छ खिल्ली उडवण्या पलिकडे काही होत नाही. नका करु व्रत वैकल्य , नका मारु फेऱ्या वडाला पण त्याचे औषधी गुणधर्म तर जाणून घ्या . वटवृक्ष अक्षय असतो , असे वृक्ष पर्यावरणाचा समतोल साधणारे असतात हा विचार का नाही रुजवत ? शिक्षणाची वाट धरणाऱ्या कितीजणांचे आपल्या शैक्षणिक विषयांवर प्रभुत्व असते ? मला सर्वसामान्यां बद्दल म्हणायचे आहे , विचारवंत , पंडितां बद्दल नाही . सर्वसामान्यांना सर्वदूर शिक्षण उपलब्ध होतय . डिग्री , डिप्लोमा आहे पण ज्ञानाचं काय ?
आपल्या रुढी, परंपरांमधे विज्ञान दडलेले आहे . तेंव्हा प्रत्येक कथे मागचा विचार काय याचा शोध घ्या .आपल्या संस्कृतीची खिल्ली उडवणारे मेसेजेस विचार न करता forward करणे योग्य नव्हे. आधुनिकता आणि समाजातील so called प्रतिष्ठितांच्या प्रभावाखाली येऊन सनातन संस्कृतीला कालबाह्य , बुरसटलेली ठरवल्यामुळे आज समाज विस्कळीत झाला आहे हे लक्षात घ्या.
सावित्री सारखे संस्कारी , बुद्धीमान व्हा. तिच्यासारखे सखोल ज्ञान मिळवून , argumental होऊन समोरच्याला निरुत्तर करा . स्वतः पती निवडतांना सारासार विचार करा . निवडलेल्या पतीबरोबर संसार निभवा . पटलं तर ठीक नाही तर व्हा वेगळे असा विचार काय कामाचा ? आयुष्यात जोडीदाराचे फार महत्व आहे तेंव्हा आपल्याला त्याचा सहवास निरंतर लाभो अशी कामना करणे चुकीचे कसे असेल ? अर्थात त्याला जोडीदारही तसाच हवा गुणवान सत्यवाना सारखा आदर्श ! असा पुरुष प्रत्येकीच्या जीवनात येणं कठीणच . तेंव्हा स्त्रियांनी खऱ्या अर्थाने सावित्री व्हावे आणि पतीच्या दीर्घायुष्याची कामना करावी असे जर वाटत असेल तर प्रत्येक पुरुषाने पत्नीचा आदर करणाऱ्या मृदुभाषी , गुणवान सत्यवानासारखे होण्याचा प्रयत्न करावा तरच सावित्रीबाईंनी स्री शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
सौ. अमृता खोलकुटे