भरदिवसा नागनदीत धारदार शस्त्राने सपासप वार करून युवकाचा खून

नागपूर : २३ जून – नागपुरात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी नगर परिसरात भरदिवसा योगेश धोंगडे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपीने तरुणाला नाल्यात उतरवून धारदार शस्त्राने वार केले. यावेळी त्याच्या रक्ताने नाल्याचे पाणी लालेलाल झाले. बघ्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला, मात्र कोणीही मदतीला न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाने आत्महत्या करण्याचा प्रकार नागपुरात ताजा असतानाच भरदिवसा शिवाजी नगर परिसरात आणखी एक हत्या घडली. आरोपी गोलू धोटे याच्या पत्नीशी त्याच परिसरात राहणाऱ्या योगेश धोंगडे याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं बोललं जातं.
आरोपीने योगेशला बोलण्यासाठी नाग नाल्याजवळ बोलावलं होतं. यावेळी दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला, की गोलूने त्याला नाल्यात उतरवत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. विशेष म्हणजे अनेक जण हा प्रकार बघत राहिले होते. त्यांनी या घटनेचा व्हिडीओही शूट केला. त्यानंतर आरोपी पसार झाला.
दरम्यान, तरुणावर हल्ला झाल्यामुळे त्याच्या रक्ताने नाग नदीचं पात्र लालेलाल झाल्याचं पाहायला मिळालं. हत्येच्या थराराची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply