नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नागपूर:२३ जून- नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी तर, पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मतदान होणार आहे. १९ जुलैला ही पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लावण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नागपूरसह अकोला, वाशीम, नंदूरबार आणि धुळे या पाच जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका जाहिर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या १६, तर पंचायत समितीच्या ३१ अशा एकूण ४७ जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ही निवडणूक होत आहे, त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलाच कस लागणार आहे. डिसेंबर २०१९च्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरुन निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १६ आणि पंचायत समित्यांच्या ३१ सदस्यांचं सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं.
त्या रिक्त जागांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसी उमेदवारांना चांगलाच कस लागणार आहे.
२९ जून २०२१ ते ५ जुलै २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. ४ जुलै २०२१ रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ६ जुलै २०२१ रोजी होईल, नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे ९ जुलै २०२१पर्यंत अपील दाखल करता येईल
अपील नसलेल्या ठिकाणी १२ जुलै २०२१; तर अपील असलेल्या ठिकाणी १४ जुलै २०२१पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, १९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५. ३० या वेळेत मतदान होईल, २० जुलै २०२१ रोजी मतमोजणी होईल.

Leave a Reply