जळगाव : २३ जून – जळगाव दौऱ्यावर आले असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आदिवासी नृत्यावर चांगलाच ठेका धरला. विशेष म्हणजे, धनुष्यबाण हाती घेत नानांनी आदिवासी नृत्याचा आनंद लुटला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून नाना पटोले यांची तुफान फटकेबाजी पाहण्यास मिळत आहे. कधी भाजपवर तर कधी आपल्याच मित्र पक्षावर नाना पटोले टीका करताना पाहण्यास मिळाले. पटोले यांचा हा चार दिवसांचा दौरा आहे. २६ जून रोजी नाशिक येथे त्याची सांगता होईल.
फैजपूर येथे नाना पटोले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आदिवासी मुद्द्यावर नाना पटोले, अतुल लोंढे आणि प्रणिती शिंदे यांनी ठेका धरला. नाना पटोले नृत्य करत म्हटल्यावर त्यांच्यासोबत इतर नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले.
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली.
या दौऱ्यात नाना पटोले धुळे, नंदुरबार आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्याला ते भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत. या भागातील कोविड सेंटर आणि कोविड रुग्णालयांना ते भेट देतील तसंच काँग्रेस पक्षातर्फे सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेणार आहेत.