अहमदनगर: २३ जून- अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईत बैठक झाली.
यावेळी नगरमध्ये भाजपला शह देण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येणे गरजेच आहे, असं एकमत झालं असून एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे, अशी माहिती शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिली.
नगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येण्याची भूमिका घेतली. नगरमध्ये तिन्ही पक्षांनी एकमेकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नगरमध्ये महापौरपदाची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचा निर्णय झाला आहे.
नगर पालिकेत विद्यमान महापौरांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपणार आहे. त्यामुळे ३० जून रोजी महापौर निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजता महापौर निवडणुकीची सभा होणार आहे. महापौरपद हे ‘अनुसूचित जाती महिला’ प्रवर्गाकरिता राखीव आहे.