नागपूर : २२ जून – एकाच घरात राहणाऱ्या पुतण्याने आणि त्याच्या बायकोने प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या काकाची हातोड्याने वार करून हत्या केल्याची घटना पाचपावली हद्दीत बारसेनगरात रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. काकाला गंभीर जखमी करून पुतण्या पसार झाला. तर त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाचपावली हद्दीत बारसेनगर, महादेव शिव मंदिरामागे नामदेव लक्ष्मण निनावे (५0) राहायचे. ७00 ते ८00 स्वे. फुटात त्यांचे तीन खोल्यांचे घर आहे. समोरच्या खोलीत नामदेव रहायचे. ते फुगे विकण्याचे काम करायचे. मधल्या खोलीत त्यांचा पुतण्या नितीन वसंता निनावे (३३) त्याची पत्नी माधुरी नितीन निनावे (२५) हिच्यासोबत राहायचा. तर शेवटच्या खोलीत नितीनची आई राहते. एकाच घरात तिघेही वेगवेगळे राहतात. पण, सर्वांना येण्याजाण्यासाठी एकच दरवाजा असल्याने सर्व नामदेवच्या खोलीतूनच ये-जा करायचे. त्यामुळे ‘माझ्या खोलीतून का ये-जा करता,’ असे म्हणत नामदेव सतत वाद घालायचा. त्यांच्या घरी नेहमीच या कारणावरून भांडण व्हायचे. रविवारी रात्रीही याच कारणावरून भांडण सुरू झाले. त्यामुळे चिडलेल्या नितीन आणि माधुरीने नामदेव यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून लोखंडी हातोडीने नामदेवच्या तोंडावर, डोळयावर, नाकावर आणि कपाळावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. काकावर वार करून आरोपी नितीन पसार झाला. मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना मेयो हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. तेथे सोमवारी मध्यरात्री १.३0 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नितीनचा शोध सुरू आहे.