येत्या काळामध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ – देवेंद्र फडणवीस

पुणे : २१ जून – शिवसेना आमदार आणि नेते प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे सध्या राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात काय घडामोडी घडतात?, याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. यावर आता विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात एका लग्न सोहळ्यासाठी आले असताना त्यांना पत्रकारांनी गराडा घातला. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रताप सरनाईक यांच्या पत्राबाबत प्रश्न विचारले. हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असल्याचं स्पष्ट केलं.
“अशी अनेकांची इच्छा असू शकते.हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या प्रमुखांना लिहीलं आहे. त्यांना काय सांगायचे ते सांगितलं आहे. भाजपाचं एक पक्क आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडतोय. मागच्या वेळेस आम्ही मोठा पक्ष म्हणून निवडून आलो. मात्र आम्हाला बहुमत नव्हतं. आम्ही युतीत लढलो होतो. येत्या काळामध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“भारतीय जनता पार्टी स्वबळावरच लढत आहे. प्रश्न त्यांचाच आहे. आता त्यांनी ते आपआपसात ठरवायचं आहे. कुणी कुणाला जोडे मारायचे आहेत, कुणी कुणाला हार घालायचे आहेत. कुणी कुणासोबत जायचं आहे. हा त्यांचा निर्णय त्यांना करायचा आहे. आमची बांधिलकी ही जनतेशी आहे. जनतेच्या बांधिलकीतून भाजपा काम करतंय.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Leave a Reply