नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नावचं योग्य – राज ठाकरे

मुंबई : २१ जून – ‘नवी मुंबई विमानतळ हे नव्याने बांधले जात जरी असले तरी तो मुंबई विमानतळाचाच एक भाग आहे. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं’ असं परखड भाष्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीला मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते राज ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ‘नवीन होत असलेल्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी आहे. सरकारकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह आहे. मी त्यांच्यापुढे वस्तुस्थिती ठेवली. नवीन विमानतळे ही शहराच्या बाहेर होत असतात. जरी ते विमानतळ नवी मुंबईत होत असले तरी ते मुंबईचे विमानतळ असणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबईत जागा नसल्यामुळे नवी मुंबईमध्ये विमानतळ होत आहे. त्यामुळे त्या विमानतळाला शिवाजी महाराज यांचं नाव असेल असं मला वाटतं. हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सुद्धा या विमानतळाला शिवाजी महाराज यांचंच नाव सूचवलं असतं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
‘आता जसं छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे तेच नाव तिकडे असणार आहे. मुंबईतील विमानतळ हे डोमेस्टिक असेल आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे नाव देणे उचित असेल, ते विमानतळ या विमानतळाचा भाग आहे. त्याचा कोड BOM हेच असणार आहे, असंही राज ठाकरे यांनी समजून सांगितलं.
‘विमानांना पार्किंगला जागा नाही म्हणून मुंबई विमानतळाची ही अवस्था आहे. आज महाराजांच्या नावावर चर्चा काय करायची. विमानतळ पहिल्यांदा झालं पाहिजे. आता माझ्या बोलण्यानंतर कोण रस्त्यावर उतरतंय ते बघूया, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

Leave a Reply