नागपूर : २१ जून – कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन एका व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नागपुरच्या पाचपावली परिसरात ही घटना घडली आहे. आरोपीनं पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह सासू आणि मेहुणीची हत्या केली आहे. सासू आणि मेहुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आलोक माथुरकर असं आरोपीचं नाव असून याने त्याची पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल यांची त्याच्या स्वतःच्या घरात, तर शंभर फुटावर रोडच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या घरात सासु लक्ष्मी देविदास बोबडे आणि मेहुणी अमिषा यांची निर्घुण हत्या केली. आरोपीने सासू आणि मेहुणीला गळा चिरून ठार मारले तर पत्नी मुलगी आणि मुलाची डोक्यावर हातोड्याने फटके मारून हत्त्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला.
४८ वर्षीय आलोक हा टेलरिंगचे काम करीत होता. गोळीबार चौकात तो भाड्याच्या खोलीत रहात होता. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आलोकचे मेहुणीसोबत प्रेम संबंध होते. त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होत होते. यावरून पती- पत्नीमध्ये वाद होत होते. या वादाची परिणिती काल रात्री कडाक्याच्या भांडणात झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आलोक रविवारी रात्री जवळच राहणाऱ्या सासू लक्ष्मी यांच्याघरी गेला. तिथे त्याने सासू लक्ष्मी आणि मेहूणी अमिषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवे मारले. त्यानंतर तो रात्री घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने पत्नी, मुलगा व मुलगी या तिघांना ठार मारले. त्यानंतर सकाळच्या सुमारास आलोकने सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना पहाटेच्यावेळी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुपारी १२च्या दरम्यान या घटनेचे वृत्त आगी सारखे शहरात पसरले त्यानंतर उपराजधानीत या भयानक हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. शेजारच्या लोकांना घरातून आवाज आला नसल्यानं संशय आल्यानंतर त्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना सर्वांचे मृतदेह दिसले. शेजाऱ्यांनी या बाबत तहसील पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.