अमित शाह यांनी केला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

नवी दिल्ली : २१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आजपासून देशात लसीकरणाचा नवीन टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात, १८ वर्षांवरील सर्व लोकांना विनामूल्य लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथून याचा शुभारंभ केला. अमित शहा तीन करोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करतील. आजपासून (२१ जून) १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना केंद्र सरकार विनाशुल्क लसी देईल आणि लसीची प्रक्रिया त्वरित वाढविण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधानांनी घेतला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील पंडित दीन दयाल उपाध्याय केंद्रात लसीकरणाचा आढावा घेतला. अमित शहा म्हणाले की, एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मोठा निर्णय आहे. आज योग दिनानिमित्त याची सुरुवात देशभर सुरू आहे. आता आम्ही प्रत्येकाला लस देण्याच्या उद्दीष्ट्याकडे झपाट्याने पोहोचू.
यावेळी अमित शहा म्हणाले की, भारत सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आयोजन केले आहे. करोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी भारत सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळणार आहे. शाह यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की सर्व लोकांनी लसीकरण केलेच पाहिजे तसेच करोनावर मात करण्यासाठी दुसरी लस देखील वेळेवर घ्यावी.
योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी करोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

“आज जेव्हा संपूर्ण जग करोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

Leave a Reply