वर्धा : २० जून – वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोनाच्या काळात अनेक कारणांनी चर्चेत राहिलं. सामान्य रुग्णालयातून दुचाकी चोरीला जाणे नित्याची बाब झाली. मात्र, दोन दिवसांपूर्वी रुग्णालय परिसरातून चक्क रुग्णवाहिकाच चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वरिष्ठांना काहीच माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
कोरोना काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांवर उपचार मिळत नसल्याच्या घटनांनी राण उठले होते. त्यामुळे सामान्य रुग्णालय चर्चेत आलंय. आता जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून दुचाकी गाड्या चोरीला जाणे नवीन बाब राहिली नाही. मात्र, अकरा वॉर्ड नंबर समोर उभी असणारी रुग्णवाहिका (MH32-G0-151) दोन दिवसांपूर्वी चोरट्याने चोरून नेली. ही रुग्णवाहिका गर्भवती महिलांना ने-आन करण्यासाठी वापरली जात होती.
शनिवारी रात्री रुग्णवाहिकेचा चालक गाडी बघायला आला असता गाडी उभी नसल्याचे त्याच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, गाडीच्या चाव्या रुग्णालयात असताना गाडी कुठे गेली? या विचारात शोधा शोध घेण्यात आला. लागलीच पोलीस ठाणे गाठण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध घेण्याचा सल्ला दिला. रात्री उशिरापर्यंत रुग्णवाहिकेचा शोध घेण्यात असता तेव्हा शहरा नजीकच्या चितोडा परिसरातील निर्जनस्थळी ही रुग्णवाहिका उभी असल्याचा सुगावा लागला. त्यानंतर ही गाडी ताब्यात घेऊन पोलिसाकडून कारवाई करण्यात येत आहे.
मात्र, यानिमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बेजबाबदारपणाचा कळस उघडकीस आला. पण दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असताना रुग्णवाहिका चोरीला गेली. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर डॉ. निमोदिया, डॉ. गाठे यांच्याशी संपर्क केला असता घटनेबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. सगळ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती का नाही, वरिष्ठ अशा घटना बाबत गंभीर का नाही, यासह अनेक प्रश्न आता उपस्थित केल्या जात आहे.