संपादकीय संवाद – काँग्रेसमधील पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व झुगारण्यासाठी डॉ. सुनील देशमुखांनी दिली हाक

काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेते आमचे तिकीट कापायचे असा घणाघाती आरोप भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेणारे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी आज जाहीर कार्यक्रमात बोलताना केला आहे. डॉ. देशमुखांनी एक उघडे गुपित खुलेआम बोलण्याचे धाडस दाखवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे.
महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः काँग्रेसमध्ये कायम पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा राहत आला आहे. याला गत ६५ वर्षांचा इतिहास साक्षी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेता म्हणजेच यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे या एका कारणासाठी १९६० मध्ये एरवी वेगळे होऊ घातलेले विदर्भाचे स्वतंत्र राज्य दिले गेले नाही, त्यावेळी चव्हाणांनी विदर्भाला झुकते माप देण्याचे मान्य केले होते. मात्र स्वतःचाच शब्द त्यांनी फिरवला चव्हाण महाराष्ट्रातून दिल्लीला गेले खरे पण महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल त्यांनी आपल्याच हातात ठेवला होता. त्यामुळे त्यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले मारोतराव कन्नमवार , वसंतराव नाईक, आणि शंकरराव चव्हाण आपल्या भागासाठी काहीही करू शकले नाही. त्याकाळात कन्नमवार म्हणायचे की आम्ही भारतासारखे पादुका सांभाळणारे आहोत. आणि आमचा राम दिल्लीत बसला आहे. चव्हाणांच्या या पश्चिम महाराष्ट्र प्रेमी कूटनीतीमुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष सतत वाढतच राहिला. आजही तो अनुशेष संपलेला नाही.
चव्हाणांनंतर त्यांची गादी शरद पवारांनी सांभाळली त्यामुळे पवार दिल्लीत गेल्यावर सुधाकरराव नाईकांची मुख्यमंत्री म्हणून कशी ससेहोलपट होत होती,याच्या नोंदी मंत्रालयात सापडतील परिणामी थोड्याच दिवसात नाईकांना बाजूला करून पुन्हा पवार प्रतिष्ठित झाले.
पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तरी देखील काँग्रेसवर त्यांचा अदृश्य हात फिरताच होता. दरम्यानच्या काळात हर्षवर्धन पाटील,सुशीलकुमार शिंदे,पृथ्वीराज चव्हाण,हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला वरचष्मा ठेवण्यासाठी तयार झाले होते. याच दरम्यान काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेसनेही महाराष्ट्राच्या राजकारणावर आपले वजन निर्माण केले होते. १९९९ ते २०१४ या कालखंडात अजित पवार जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची दादागिरी उभ्या महाराष्ट्राला असह्य करून सोडणारी होती.
अजितदादांच्याकाळात सुनील देशमुख, अजितदादांचेच राज्यमंत्री म्हणून काहीकाळ कार्यरत होते. त्यामुळे त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या दबावतंत्राचा जोरदार अनुभव आला असणार हे निश्चित. त्यामुळेच त्यांनी हे विधान केले असणार हा निष्कर्ष काढता येतो. सुनील देशमुख हे उच्च विद्याविभूषित असलेले वैदर्भीय नेते आहेत त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. आणि कामाचा झपाटही चांगला आहे. त्यामुळेच असा अभ्यासू आणि कामसू नेता पुढे आला तर पश्चिम महाराष्ट्राला ते अडचण ठरू शकते हे धोरण नजरेसमोर ठेऊनच २००९सोळंकी डॉ. सुनील देशमुखांचे अमरावती विधानसभा क्षेत्रातील तिकीट कापून तिथे रावसाहेब शेखावत या काहीही जनाधार नसलेल्या राष्ट्रपती पुत्राला आणले गेले हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे देशमुखांच्या राजकीय वाटचालीला ब्रेक लागला आणि त्यांना भाजपची साथ घ्यावी लागली.
आता डॉ. देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत सुदैवाने पक्षाचे नेतृत्व आता वैदर्भीय नेत्याकडे आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसोबत आता डॉ. नितीन राऊत अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात,हे पश्चिम महाराष्ट्राबाहेरील नेतेही तयार झाले आहेत त्यामुळे आता काँग्रेसमधील राजकारणावर असलेले पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व कमी बोली अशी आशा करायला हरकत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे वर्चावा कमी करून स्वतःचे नेतृत्व प्रतिष्टीत करण्यासाठी डॉ. सुनील देशमुखांना पंचनामाच्या हार्दिक शुभेच्छा

अविनाश पाठक

Leave a Reply