गडचिरोली : १९ जून – नक्षलवाद्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्या दलममध्ये नकळत सहभागी झालेल्या २0 वर्षीय तरुणीने नक्षलवादास तिलांजली देण्याचा निर्णय घेऊन स्वत:च्या आणि पर्यायाने विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश घेतला. सदर तरूणीने सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक मानस रंजन यांचे समोर आत्मसर्मपण केले.
करिश्मा ऊर्फ गंगा ऊर्फ सविता अजय नरोठी असे आत्मसर्मपण करणार्या तरुणीचे नाव असून ती छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यातील पुसुगुट्टा येथील रहिवासी आहे. करिष्मावर चकमकीचे चार गुन्हे असून, शासनाने दोन लाखाचे बक्षीसही आहे.
करिष्मा हीने वयाच्या साधारणतरु १३ व्या वर्षी माओवाद्यांच्या दलममध्ये नकळत सहभागी झाली होती. ती सध्या चातगाव दलमची सदस्य होती. मागील वर्षी चातगाव दलमच्या जवळ जवळ सर्व सदस्यांनी एकाच दिवशी आत्मसर्मपण करून राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभाग नोंदवला होता. करिष्मा त्यानंतर एकटी पडली आणि काही काळ ती टिपागड दलम सोबत राहिली. टिपागड दलममधील बरेच सदस्य चकमकीत मारले गेले व काहींनी आत्मसर्मपण केले. त्यामुळे हे दल आता जवळ जवळ संपुष्टात आले. त्यानंतर सैरभैर झालेली करिष्मा सीआरपीएफच्या ‘रेंज फिल्ड टीमच्या’ नजरेत आली. त्यांनी तिच्याशी संपर्क साधून तिच्या मनात विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच्या सुपरिणामांचे आनंददायी चित्र रेखाटले. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला. असे डीआयजी सीआरपीएफ मानस रंजन यांनी पत्रकारांना सांगितले.
गडचिरोली पोलिस दलाने सातत्यपूर्ण यशस्वी नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच गडचिरोली पोलिसांनी जिल्हाभरात आदिवासी बांधवांकरिता घेतलेले जनजागरण मेळावे, शांती मेळावे, ग्रामभेटी तसेच जे तरू ण-तरूणी नक्षलमध्ये भरती झाले आहेत, त्यांच्या घरी जावून त्यांना सुखी जीवनाचे महत्व पटवून सांगितल्याने व नक्षल नातेवाईकांसाठी मदत, आयोजित केलेल्या सहलीमुळे तसेच कार्यरत नक्षल सदस्यांचे कुटुंबियांच्या मेळावे यामुळे त्यांच्या मनात पोलिस दलाविषयी निर्माण झालेला विश्वास याचा परीपाक म्हणून आज करिष्मा या जहाल महिला नक्षलीने आत्मसर्मपण केले, असे पोलिस अधीक्षक गोयल यांनी सांगितले.
करिष्मावर चकमकीचे चार गुन्हे असून, दोन लाखाचे बक्षीसही आहे. करिष्माच्या निर्णयाबद्दल डीआयजी मानस रंजन व एस. पी. अंकित गोयल यांनी पोलिस विभागातर्फे पुष्पगुच्छ आणि दुपट्टा देऊन तिचे नवीन जीवनात स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. गोयल यांनी सांगितले की वर्ष २0१९ ते २0२१ या कालावधीत आतापयर्ंत ३८ माओवाद्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश घेतलेला आहे. यात ४ डिव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर, २८ सदस्य व १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.