नागपूर : १९ जून – शिवसेना आणि काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फटकारले आहे. निवडणुकांना अजून अवकाश आहे. त्या आगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असा टोला लगावतानाच 2024 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा असेल याचा फॉर्म्युलाही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. निवडणुकांना आणखी तीन वर्ष बाकी आहेत. त्या आगोदरच युती, आघाडी, स्वबळाची भाषा करणं शहाणपणा नाही, असा टोला पटेल यांनी राऊत आणि पटोले यांना लगावला आहे. ‘सामना’ वाचल्यावर काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील म्हणतात, निवडणुकांबाबतचा निर्णय २०२३ मध्ये होईल. त्यामुळे त्यावर आताच भाष्य करणं योग्य होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यावरही पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही सांगून टाकला. लोकशाहीत कुणालाही मुख्यमंत्री होता येतं. ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल तो मुख्यमंत्री होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या बहुमत महाविकास आघाडीकडे आहे आणि आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे आता जागा रिकामी नाही, असा चिमटाही त्यांनी पटोले यांना काढला. दरम्यान, पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला सांगून आगामी काळात मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादीचाही दावा असणार असल्याचे संकेतच दिले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी बोलणं यात काही गैर नाही, असं ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही सध्या भाष्य करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. तसेच ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात समन्वय आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.