अमरावती : १८ जून – फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत झालेला पराभव जिव्हारी लागला, आणि त्यानंतर लग्नात कोरोनाचे नियम न पाळल्याने ग्रामपंचायतने दिलेला पन्नास हजाराचा दंड दिला होता. या दोन्ही घटनेला जबाबदार असल्याच्या रागातून चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावातील मुंडे दाम्पत्याला माजी उपसरपंच गजेंद्र येवले व अन्य दोघांनी जीवघेणी मारहाण केली होती. या प्रकरणी चिखलदरा पोलीसांनी माजी उपसरपंचासह चार जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
दहेंद्री गावातील माजी उपसरपंच गजेंद्र येवले यांच्या कुटुंबीयांचा निवडणुकीतील पराभव झाला होता व कोरोना नियम मोडल्याने पन्नास रूपयांचा दंड भरावा लागला होता. या दोन्ही घटनेला मुंडे दाम्पत्याला जबाबदार धरून लाठी काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. असा आरोप प्रवीण मुंडे आणि मालती मुंडे यांनी केला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत मुंडे दाम्पत्याने चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथे असलेल्या पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि मारहाणीचा व्हिडीओ सुद्धा पोलिसांना दिला आहे. त्यामुळे मुंडे दाम्पत्याच्या तक्रारीवरून रुंजू सोनू येवले, पुण्या सोनू येवले, गजेंद्र रुंजू येवले, गुंता देवेंद्र येवले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाही न करता उलट आरोपीलाच पाठीशी घातल्याचा आरोप मारहाण झालेल्या दाम्पत्याने केला आहे. काटकुंभ येथील जमादार यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने मुंडे दाम्पत्याने याची तक्रार अमरावती येथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. माजी उपसरपंच आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुंडे दाम्पत्याने केली आहे.