बीड : १८ जून – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी वैद्यकीय सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांची गाडी अडवली. गाडी समोर झोपण्याचा प्रयत्न या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमार केला. आक्रमक कर्मचाऱ्यांनी थेट अजित पवार यांच्या गाडी समोर उडी घेतली
या लाठीमारा दरम्यान महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हा खरीप हंगामाचा घेणार आढावा घेतला. तसंच कोविड च्या परिस्थितीचाही आढावा घेतला. त्यानंतर आढावा बैठत घेतली. अजित पवार यांच्या आढावा बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. बीड मधील कोरोना संख्या कमी करण्यासाठी अजित पवारांनी सूचना दिल्या. तसंच आरोग्य यंत्रणेची कान उघाडणी केली.
अजित पवारांच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करण्यात आली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक सुरू होती. याच दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी घोषणाबाजी केली. यावेळी सदरील तरुणाने एक मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी सदरील तरुणाला ताब्यात घेतले आहे.