पुणे : १८ जून – मंगळवारी पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ एका सहा वर्षाच्या मुलाचा आणि सासवड परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. संबंधित मायलेकराची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालं होतं. त्यामुळे सहलीला गेलेल्या या पुण्यातील कुटुंबीयांसोबत नेमकं काय घडलं याचं गूढ बनलं होतं. बेपत्ता वडिलांनी मायलेकराची हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता, त्यानुसारच पुढील तपास केला जात होता. पण मायलेकराच्या हत्याकांडातील मुख्य संशयित असणारे बेपत्ता वडील आबिद शेख यांचाही मृतदेह नदीपात्रात आढळून आला आहे. आज (शुक्रवार) सकाळी खानापूर येथील नदीच्या पाण्यात मृतदेह आबिद यांचा आढळून आला आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच हवेली पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित मृतदेह आबिद शेख यांचा असल्याची पुष्टी भारती विद्यापीठ पोलिसांकडून करण्यात आली आहे. 11 जून रोजी भाड्याची कार घेऊन सहलीला गेलेलं हसतं खेळतं कुटुंब चार दिवसांत उद्धवस्त झालं आहे.
मृत आबिद यांनी मायलेकराची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना होता. पण मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या आबिद यांचा मृतदेह आढळल्यानं आता मायलेकराच्या हत्येप्रकरणात नवीन वळण लागलं आहे. मायलेकराची हत्या झालेल्या दिवशी रात्री एकच्या सुमारास मृत आबिद यांनी सातारा रोडवर भाड्यानं घेतलेली कार पार्क करुन रस्ता ओलांडून स्वारगेटच्या दिशेनं गेल्याचं सीसीटीव्हीत दिसलं होतं. त्यामुळे आबिद शेख तेथून कुठे निघून गेला, याचा शोध पोलिसांकडून केला जात होता. पण आता आबिद यांचाही मृतदेह आढळला आहे.
खरंतर मायलेकराच्या दुहेरी खून प्रकरणांत पती आबिद शेख याच्यावरच पोलिसांचा सर्व तपास केंद्रीत करण्यात आला होता. आबिद आणि आलिया हे दाम्पत्य मुळचे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. प्रेमविवाह केल्यानंतर 2007 पासून ते नोकरीच्या निमित्तानं पुण्यात वास्तव्याला आले होते. दोघंही उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील होते. आबिद शेख हा एका कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होता. तर आलिया एका वित्तपुरवठा कंपनीमध्ये नोकरी करीत होत्या.