लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का? – नाना पटोले यांचा सवाल

मुंबई : १७ जून – कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची कोणतीही शिफारस केली नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. त्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला? लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे का? लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का? असे सवाल नाना पटोले यांनी केले आहेत.
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे सवाल केले आहेत. कोरोना महामारीचे संकट हाताळण्यात केंद्रातीलमोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे वारंवार उघड झाले आहे. लसीकरणाचेही कोणतेच ठोस धोरण मोदी सरकारकडे नसल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. आता तर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय 13 मे रोजी सरकारने घेतला. हा निर्णय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीवरून घेतल्याचे सांगितले गेले. परंतु अशी शिफारस केली नसल्याचा आणि त्याला कोणताच वैज्ञानिक आधार नसल्याचा खुलासा त्या गटातील संशोधकांनी केला आहे. मग हा निर्णय मोदी सरकारने कोणाच्या सांगण्यावरून व कशाच्या आधारावर घेतला याचा खुलासा झाला पाहिजे?, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
ज्या संशोधकांचा हवाला देत मोदी सरकारने लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. तो सरकारचा दावा धादांत खोटा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दोन लसीमधील अंतर वाढवण्याचा निर्णय फक्त कोविशिल्ड लसीबद्दलच का घेतला गेला? लसींच्या तुडवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आली आणि त्यामुळे मोदींची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून हा सारा खाटाटोप केला आहे का? लसीकरण मोहिमेत मोदी सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठीच हा निर्णय घेतला नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत असून केंद्र सरकारने जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. मोदी सरकारच्या काळात मरण स्वस्त झाले आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
लसीमुळे कोरोनापासून होणारा धोका कमी होण्यास मदत होते हे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. परंतु मोदी सरकारकडे लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही. लसींची आवश्यक मागणी लस उत्पादक कंपन्याकडे न करताच आधी 45 वर्षांवरील आणि नंतर 18 वर्षावरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्य सरकारकडे लसींचा पुरवठाच योग्य त्या प्रमाणात केला गेला नाही. दोन कंपन्यांवरच विसंबून राहिल्याने लसीकरण मोहीम फसली. घरोघरी जावून लस द्यावी असे उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले होते. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनीही सर्वांना मोफत लस देण्यासंदर्भात मोदी सरकारला पत्र पाठवून सल्ला दिला होता. त्यांच्या सल्ल्याकडे मोदींनी दुर्लक्ष केले, आतातरी त्यांचा सल्ला ऐकून लोकांच्या जिवीताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

Leave a Reply