कुंभमेळ्यातील कोरोना चाचणी करण्याचे काँट्रॅक्ट घेणारी कंपनीचं बनावट असल्याचे उघड

नवी दिल्ली : १७ जून – उत्तरखंडमधील हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये करोना चाचण्यांसंदर्भात झालेल्या घोटाळ्यातील नवीन नवीन माहिती रोज समोर येत आहे. कुंभमेळ्यासंदर्भात आरोग्य विभागाने ज्या मॅक्स कॉर्परेट नावाच्या कंपनीला एक लाख करोना चाचण्यांचं कंत्राट दिलं होतं ती कंपनीच अस्तित्वात नसल्याची माहिती समोर आली आहे. पडताळणीमध्ये एक लाख करोना चाचण्यांचं कंत्राट देण्यात आलेली मॅक्स कॉर्परेट कंपनी केवळ कागदावर म्हणजेच ऑन पेपर असल्याचा खुलासा झालाय. एका बनावट कंपनीला कुंभमेळ्यामधील करोना चाचण्यांचं कंत्राट देण्यात आल्याचं उघड झाल्याने कुंभमेळा आयोजनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीची नोंदणी ज्या पत्त्यावर झालीय त्या ठिकाणी कोणताही कंपनी अस्तित्वात नाहीय. या प्रकरणामध्ये प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तपास समितीची स्थापना केलीय. तर दुसरीकडे कुंभमेळ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही आपल्या बाजूने एका समितीची स्थापना करुन तपास सुरु केलाय. कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉ. अर्जुन सिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने सर्व खासगी प्रयोगशाळांसोबत करार केला होता. मात्र दिल्लीमधील लाल चंदानी लॅब आणि हिस्सारमधील नालवा प्रयोगशाळेसोबत थर्ड पार्टी करारानुसार कंत्राट देण्यात आलं होतं.
हरिद्वारचे जिल्हाधिकारी सी. रविशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान खासगी प्रयोगशाळांच्या काराभारामध्ये अनेक ठिकाणी नियोजनामधील गोंधळ दिसून आला. यामध्ये दुसऱ्या शहरांमधील नावांचा वापर करणे, एका ओळखपत्रावर अनेकदा चाचण्या झाल्याचं दाखवणं आणि एकाच प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात येणं यासारख्या प्रकरणाचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून १० दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाणार आहे. गोंधळ असल्याचं सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या कुंभमेळ्यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. करोना कालावधीमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होणाऱ्या या कुंभमेळ्याच्या आयोजनाला परवानगी दिल्याने आधीच वाद झालेला असतानाच आता या कुंभमेळ्यामधील करोना चाचाण्यांसंदर्भातील माहिती समोर येत आहे. उच्च न्यायालयापासून अनेक सरकारी संस्थांनी या कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भातील सूचना केलेल्या. मात्र तरीही या कुंभमेळ्यामध्ये करोना चाचणी घोटाळा झाल्याची माहिती समोर आलीय. आश्चर्याची बाब म्हणजे हा घोटाळा पंजाबमधील फरीदकोट येथे राहणाऱ्या एका एलआयसी एजंटमुळे समोर आला. विपन मित्तल असं या एलआयसी एजंटचं नाव आहे.

Leave a Reply