परंपरांचा पाईक – पासपोर्ट
पासपोर्ट नुतनीकरणाची वेळ आली आणि सहज मन भूतकाळात सर्वात पहिला पासपोर्ट काढण्यासाठी गेलो, तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या.
पासपोर्ट आॅफिस ला गेले की सर्वप्रथम त्यावेळी चाणाक्ष दलाल हेरतात की नवं सावज कोणतं? त्यांच्या बरोबर लक्षात यायचं की कोणाला गटवता येवू शकते.
मी रांगेत उभा होतो, जुनचा उकाडा आणि आॅफिसच्या कुलर चे बारा वाजलेले. छताला लटकवलेले मोठ्या पात्याचे पंखे, तीनही पाते सहज दिसतील इतक्या वेगाने फिरत असणारे आणि रांगेतील जनता गर्मी ने हैराण हातातील कागदं घामानी, थोडे बहुत ओले झालेले, रांग मुंगी च्या पावलापेक्षा हळूहळू सरकणारी आणि सर्व रांगेक-यांचे चेहरे वैतागलेले.
आपणसुद्धा रांगेत, वैतागलेला चेहरा पाहून एक दल्ला हळूच् विचारता झाला. बघ तुला फक्त कागदपत्र आणि फोटो द्यायचे आहेत. रांगेत लागण्याची गरज नाही. काम होण्याची शंभर टक्के खात्री. त्यावेळी साधारण २००१ साली पासपोर्ट अर्ज केल्यानंतर साधारण ४५ दिवसात मिळायचा. अर्ज केला की मग “पोलिस व्हेरिफिकेशन” !!!!!!!
हा काय प्रकार असतो ????? हे पोलिसांसाठी कुरण असते. जर खरोखर “पोलिस व्हेरिफिकेशन” इमानदारीने केल्या गेले असते तर आज एका ही “गुन्हेगाराजवळ” पासपोर्ट राहिला नसता. अगदी एखाद्या वर एफआयआर दाखल झाला की पोलिसांनी त्याची माहिती “पासपोर्ट” आॅफिसला देवून सर्वप्रथम त्या गुन्हेगाराची बाहेर देशात जायची वाट बंद करायला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. पण असे का होत नाही? कारण आपल्या इथे पोलिस सिरीयसली घेत नाही आणि गुन्हेगार पोलिसांना सिरीयसली घेत नाही.
माझा मामा Dy.SP आलापल्ली च्या नक्षलवाद्यांना जीवावर खेळुन पकडून आणायचा. आलापल्ली, नक्षलवादी क्षेत्र त्याला “पैसा न खाणारा पोलिस अधिकारी” म्हणून आंदणात मिळालेलं.
त्या नक्षलवाद्यांचे धागेदोरे तेथील आमदार, खासदारांशी जोडले असायचे आणि एक दोन दिवसात कायद्याच्या चौकटीतून त्या नक्षलवाद्याची सुटका करावी लागायची. मग मामा, त्यांना जी शिव्यांची लाखोली वाहायचा… अतिशय श्रवणीय….. दोन-तीन नवीन शिव्यांची भर पडायची…..एक तर मामाची बदली मुद्दाम नक्षलवादी क्षेत्रात केलेली, कारण हा माणूस इमानदारीने ड्युटी करायचा…. मामाने १८ वर्षे नौकरी केल्यानंतर, एक सेकंड हॅंड बजाज कब स्कुटर विकत घेतली. त्यावेळेस चा त्याच्या चेह-यावरील आनंद वर्णनातीत आहे. पण सांगायचं तात्पर्य आपल्या सिस्टम मध्ये इमानदारीचे झेंडे गाडुन, काय बदलाव करु शकला? सोप्या भाषेत – काय उखाडलं? इमानदार राहुन !!! आपण निवडून दिलेले आमदार, खासदार जर भ्रष्टाचारी आहेत, तर पोलिसांनी कोणतं घोडं मारलं? खाऊ देत त्यांनाही. आपल्या घटनेने, कार्यपद्धती ला काही अलिखित नियम दिले आहेत. सर्व सरकारी अधिकाऱ्यांना अधोरेखित कुरणाची व्यवस्था आहे आणि सर्वसामान्य जनतेला लुटण्याची मुभा आहे. नाहीतर तुमच्या फाईलीत असंख्य दोष सरकारी यंत्रणा काढेल. थकुन शेवटी तुम्ही खिशात हात टाकाल आणि म्हणाल बाबारे! किती हवे घे एकदाचे आणि सोडीव पाशातून.
मग पोलिस ठाण्यात तुम्हाला पाचारण करण्यात येते. पासपोर्ट वाल्यांसाठी एक विशिष्ट वेळ ठरवलेली असते, मला आपल्या कागदपत्रांसह ४.३० दुपारी बोलावले होते. मी अगदी वेळेवर हजर झालो. माझ्या आधी अजून २-३ लोकं लाईनीत होते. त्यावेळी पोलिस प्रत्येकाकडून. कमीतकमी शंभर रुपये घेत असत.
आमचे व्हेरिफिकेशन ५ वाजता सुरू झाले. तोपर्यंत माझ्यामागे अजून १०-१२ जण असतील.
आलेला फॉर्म तपासला गेला. शंभर ची नोट त्या फॉर्म मध्ये टाकुन दिल्यागेली आणि पोलिसाने ती अलगद खिशात टाकत, माझ्यावर भले मोठे उपकार करीत आहे, ह्या आविर्भावात, पोलिसाने “पोलिस व्हेरिफिकेशन” सोहळा पार पाडला. त्या भल्यामोठ्या उपका-याच्या ओझ्याखाली दबलेला मी – जड स्कुटर ने तेथुन चाक काढते घेतले. (जड अंतःकरणाने…)
हे मी २००१ ची गोष्ट सांगत आहे.
पोलिस व्हेरिफिकेशन नंतर ३० दिवसाचे आत तुमचा पासपोर्ट मिळेल असे भविष्य वर्तवले गेले. त्यावेळी आजसारखी सुविधा नव्हती, फॉलोअप पण ठेवायला लागायचा. आणि एके दिवशी पोस्टमन घरी येवुन थडकला.. अलबंत्……मी घरी नव्हतो….त्याने आमच्या घरी येवुन माझ्या नावाचा पुकारा केला ….. आमच्या चांगला ओळखीचा पोस्टमन….दिवाळीला न चुकता बक्षिसी घेऊन जाणारा पोस्टमन……उन्हाळ्यात हमखास फ्रिजचे पाणी मागणारा पोस्टमन….. कधी कधी थकला असेल आणि आमच्या चहाच्या वेळेस आला असेल तर चहा घेऊन जाणारा पोस्टमन…….आज मात्र त्याने मी घरी नाही हे बघुन… बिनदिक्कत आईला सांगुन गेला…….त्याला पोस्ट आॅफिसला पाठवा त्याच्या नावाचे पार्सल आले आहे. मी जाणकार तज्ञ…..जवळ परत एक शंभर ची नोट ठेवली. पोस्ट आॅफिसला गेलो. पोस्टमन माझी वाट बघत होता. बाकी सगळे पोस्टमन कौतुकाने त्याचेकडे पाहते झाले. तेरा बकरा आ गया….अशा च् सगळ्यांच्या नजरा असल्याचा मला भास झाला. मला भारताची प्रतिज्ञा आठवली,” माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करीन” . परंपरेचा पाईक होण्याच्या पात्रतेसाठी तळमळणारा मी, परत एकदा शंभर ची नोट पोस्टमनला दिली, मनातल्या मनात त्याला दोन चार शिव्या तुसडल्या. भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणेला भरभरून शिव्या ओतल्या. आपल्या भारत मातेला ओतप्रोत भ्रष्टाचारात लिप्त करणारी सरकारी यंत्रणा- खूप वाईट वाटले – ही असली आमची समृद्ध परंपरा, पासपोर्ट आॅफिस, पोलिस, पोस्टमन प्रसन्न करण्यासाठी भोग चढवा. छे!!! ही आमची संस्कृती???????
तो लिफाफा हातात घेतला, आधाश्यासारखा तिथेच उघडला आणि टक लावून “पासपोर्ट” बघत होतो. अच्छा पासपोर्ट असा असतो… तुजसाठी केला होता एवढा अट्टाहास.
आज …. पासपोर्ट नुतनीकरणासाठी मुलाला सांगितले तर त्याने आॅन लाईन अपॉइंटमेंट घेतली. ११-१२ वाजताचा स्लॉट मला मिळाला. प्रशासकीय पैसे देवाणघेवाण.. आॅनलाईन सरली होती, त्यामुळे वरची पुंजी खिशात घेऊन जाण्याचा प्रश्नच् नव्हता.
पासपोर्ट आॅफिसला पोचलो, प्रवेश द्वारा वर माझे जवळचे कागदपत्रे बघितली. आरोग्य सेवा अॅपवर, आलबेल तब्येत बघितल्या गेली. हातांवर सॅनिटायझर शिंपडल्या गेले, रांगेत मी दुस-या नंबरवर. वातानुकूलित हवेचा गारवा – प्रसन्न वातावरण. दोन मिनिटात माझे कागदपत्रे बघितली गेली. टोकन क्रमांक दिल्या गेला. पहिला मजल्यावर जा सांगण्यात आले, पहिल्या मजल्यावर पोचलो तो माझ्या नावाचा पुकारा – खिडकी A – 14 वर जा सांगण्यात आले. सरळ खुर्चीत जाऊन बसलो २-३ मिनिटांत कागदपत्रे – ओरिजनल सगळे बघितले गेले. फोटो ३-४ काढलेले दाखविण्यात आले. चांगला फोटो निवडला गेला, पासपोर्ट वर लावण्यासाठी. आणि खिडकी “B” मध्ये जा म्हणून सांगण्यात आले. मी तिथे पोचलो तर, सरळ परत खुर्चीत, जुना पासपोर्ट रद्द करण्यात आला. मला आता सेक्शन “C” मध्ये जा सांगण्यात आले. मी तिथे पोहोचतंच् आहे तर तिथे ही मी सरळ खुर्चीत जाऊन बसलो. पठ्ठ्याने डेस्कटॉपवरून नजर हटविली, मला बघितले “enter” चे बटन खटकले, म्हणाला झाले, आठवड्याभरात पासपोर्ट मिळुन जाईल कोरियरने.
मी बाहेर आलो. मोबाईल उघडला ११.१५ !!!!! सकाळचे…….अरे काय झाले देशाला???????
“नुतनीकरण तर नुतनीकरण” देशाचे आणि पासपोर्ट चे, असं भारतात होऊ शकतं?????
इतका पारदर्शक रित्या पंधरा मिनिटांत!!!!!!!! जनतेच्या वेळेची काळजी सरकारला केव्हापासून!!!!!!!
आकाशात वीज चमकावी आणि आकाशवाणी व्हावी….देवकीचा आठवा पुत्र मथुरेत……. तद्वतच माझ्या डोक्यात वीज कडाडली…… आकाशवाणी झाली……..”भारताच्या परंपरेचा पाईक बदलला आहे. पहिले कॉंग्रेस होती तिची आपली परंपरा भ्रष्ट होती. आज मोदी आहेत, त्यांची आपली पारदर्शी परंपरा आहे. मोदी पारदर्शी परंपरेचे पाईक आहेत.”
मी भारताच्या जनतेचे शतशः आभार मानले मोदींना निवडून दिल्याबद्दल. जायच्या आधी एक क्षण थांबलो, डोळे मिटले आज आपली परंपरा खरोखर समृद्ध झाल्याचा अभिमान – समाधान उर भरून आला आणि हृदयातून भारत मातेला वचन दिले,”माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन”.
घरी पोचता पोचता ११.४५ सकाळचे. मोबाईल वर मेसेज आला – “तुमचा पासपोर्ट प्रिंटिंग साठी पाठविला आहे”.
भाई देवघरे