कोल्हापूर : १६ जून – मराठा आरक्षणावर कोल्हापुरात खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात मूक आंदोलन पार पडलं. या आंदोलनात समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासहित जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील मानेदेखील उपस्थित होते. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडत मनोगत व्यक्त केलं. दरम्यान या मूक आंदोलनानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावत संभाजीराजेंना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचं आवाहन केलं होतं. संभाजीराजे यांनी आंदोलनानंतर बोलताना शुक्रवारी मुंबईत मराठा समन्वयकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असताना आपणही एक पाऊल पुढे टाकू असं सांगत त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र यावेळी त्यांनी नाशिक, रायगड. अमरावती आणि औरंगाबाद येथील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ते म्हणाले की, “सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी मुंबईत चर्चेला येण्याची चांगली भूमिका घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि संबंधित मंत्री उपस्थित असतील. याचं मी स्वागत करतो. पण चर्चेला गेलो याचा अर्थ आम्ही समाधानी झालो असा नाही. ती चर्चा होणार आणि त्यातून काय निष्पन्न होणार हे आम्ही पाहणार. चेतावणी द्यायची नाही पण ठरलेले मोर्चा नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगड येथे होणारच आहेत”. दरम्यान जर राज्य सरकारने सगळे प्रश्न मार्गी लावले तर मूक आंदोलन नाही तर नाशिकला विजयोत्सव करु असंही त्यांनी जाहीर केलं.
“संभाजीराजे यांनी मांडलेल्या मागण्यांसाठी राज्य सरकार १०० टक्के सकारात्मक आहे हे मला सांगायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सर्वांना आपल्याशी चर्चा करुन मार्ग कसा काढता येईल यासंबंधी चर्चा करायची आहे. सरकारला एक पाऊल पुढे टाकून सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य शासन स्तरावरील विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी तयार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण आपली भेट घेतील. राज्य सरकार सकारात्मक असून तुमच्या भूमिकेला अनुसरुनच सरकारची भूमिका आहे, त्यामुळे आपण उद्याची वेळ देऊन मुंबईला यावं,”अशी विनंती सतेज पाटील यांनी संभाजीराजेंना मनोगत व्यक्त करताना केली होती.
“सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने तात्काळ दिलीप भोसले यांच्या नेतृत्वात कमिटी नेमली. विधीमंडळात सर्वानुमते ठराव पास झाला असताना राज्य सरकार कमी पडलं बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. सुप्रीम कोर्टातील वकिलांची टीम आपण बदलली नव्हती हेदेखील सर्वांना कळणं गरजेचं आहे. जी टीम गेल्या पाच वर्षांपासून होती तीच कायम ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती,” असं सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं.