अहमदाबाद : १६ जून – गुजरातमध्ये भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. आनंद जिल्ह्यातील तारापूर हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे. कुटुंब प्रवास करत असलेल्या कारची ट्रकला धडक होऊन हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कुटुंबातील १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हे कुटुंब सूरत येथून भावनगरसाठी निघालं होतं. यावेळी इंद्रनज गावाजवळ त्यांच्या कार आणि ट्रकमध्ये धडक होऊन अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला, सात पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. सर्व मृतदेह तारापूर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.