दिल्लीत मराठी टक्का वाढायला हवा – उदय सामंत यांची अपेक्षा

नागपूर : १६ जून – महाराष्ट्र राज्य व उच्च तंत्रज्ञान विभागामार्फत ‘करिअर कट्टा ‘ या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप आल्याचा आनंद आहे. मात्र यातून यूपीएससीमधील यश वाढले पाहिजे. दिल्लीमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले आहे. विभागाच्या या उपक्रमात ते नागपूर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
कोरोना काळामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमात खंड पडू नये. यासाठी विविध संस्थांच्या सहभागात महाराष्ट्र राज्य व उच्च व तंत्रज्ञान विभागामार्फत ‘करियर कट्टा ‘ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमाचा आज शंभरावा दिवस होता. या उपक्रमाला हातभार लावणाऱ्या अनेक संस्था व व्यक्ती आजच्या विशेष कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते नागपूर येथून या कार्यक्रमात सहभागी झाले.
या कार्यक्रमात सातत्य ठेवा. युपीएससीमध्ये आपली मुले अधिक प्रमाणात चमकतील, यासाठी दिल्लीमध्ये यूपीएससी भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये पुढाकार घेणारे माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रयत्नांचे देखील त्यांनी कौतुक केले. दिल्लीतील यूपीएससी भवन उभारण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply