नागपूर : १६ जून – शेजारी राहणाऱ्या तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करून त्यातील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं आपल्या मोबाईलमध्ये गुपचूप हा व्हिडीओ शूट केला होता.
याप्रकरणी पीडित तरुणीच्या चुलत भावानं तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सूचनापत्र देऊन आरोपीला पालकांच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेनं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. तहसील पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
संबंधित आरोपी अल्पवयीन असून तो 17 वर्षांचा आहे. तर पीडित तरुणी 22 वर्षांची आहे. पीडित तरुणी सोमवारी सायंकाळी आंघोळीला गेली होती. तरुणी आंघोळीला गेल्याचं कळताच मागावर असणाऱ्या आरोपीनं आपल्या मोबाईलमध्ये गुपचूप तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला. यानंतर त्याने संबंधित व्हिडीओतून काही निवडक स्क्रीनशॉट्स काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या चुलत भावानं याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांना कळालं. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला सूचनापत्र जारी केलं आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला समज देऊन पालकांच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.