अमरावती : १६ जून – अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७०० कोटी रूपये नियमबाह्य पद्धतीने म्युचल फंडात गुंतविले आणि त्यासाठी ३ कोटी ३९ लाख २३ हजार ३१९ रूपयांची दलाली देऊन बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्य चार अधिकारी व सहा दलाल अशा एकूण ११ जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. समोर आलेल्या या प्रकरणाने सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जससिंग राठोड (तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी), निळकंठ जगताप ( मुख्य लेखापाल), सुधीर चांदूरकर ( मुख्य अधिकारी प्रशासन), राजेंद्र कडू (सांख्यकीय अधिकारी) व एक महिला कर्मचारी असे बँकेतील तर अजितपाल मोंगा, पुरूषोत्तम रेड्डी, शिवकुमार गट्टानी, राजेंद्र गांधी व दोन महिला अशी दलाली करणार्यांची नावे आहे. आरबीआयच्या 14 जुलै 2016 रोजीच्या परिपत्रकानुसार आर्थिक वर्षाच्या 31 मार्च रोजी असलेल्या एकूण ठेवीच्या 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येते. मात्र, या नियमाकडे दुर्लक्ष करून 34 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केल्याचे निदर्शनास आले. ती रक्कम 700 कोटीच्या आसपास आहे. त्यानंतर अंकेक्षण करण्यात आले. त्या अंकेक्षणात उपरोक्त अधिकारी दोषी आढळले.
विशेष म्हणजे ही गुंतवणूक थेट करणे अपेक्षित असताना ती दलालांमार्फत करण्यात आली. त्यासाठी 3 कोटी 39 लाख 23 हजार 319 रूपयांची दलाली उपरोक्त दलालांना देण्यात आली. कोणत्याही नियमात नसताना हा कारभार करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करण्यासाठी संबधित बँक अधिकारी व कर्मचार्यांनी संगनमत करून बँकेच्या नावाचे बनावट शिक्के तयार केले व खोट्या सह्याही केल्या. चौकशीत संबधितांनी बँकेची फवसणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण कागदपत्रांसह बँकेचे प्रशासक संदीप जाधव यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी एकूण 11 जणांवर भादवीच्या विविध कलमान्ये गुन्हे दाखल केले. सदर प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रेवस्कर करीत आहे. पुढील तपासातून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. आरोपींची संख्याही वाढू शकते.
बँकेचे पैसे नियमबाह्य पद्धतीने गुंतविल्याचे समोर आल्यानंतर काही सभासद, शेतकरी व भाजपाचे आमदार प्रताप अडसड, रविराज देशमुख, धनंजय उमप यांच्यासह अन्य काही मंडळींनी सदर प्रकरणा विरोधात आवाज बुलंद केला होता. सखोल चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली होती. काही शेतकर्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. दबाव वाढल्यानंतर अंकेक्षण करण्यात आले आणि त्यातून सर्व काही समोर आले.