नवी दिल्ली : १५ जून – अयोध्यामध्ये राम मंदिराशी संबंधित असलेल्या जमीन खरेदीच्या घोटाळ्याच्या आरोपाने ट्रस्टला घेरले आहे. आता या संपूर्ण वादावर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केंद्र सरकारला अहवाल पाठविला आहे. ट्रस्टने सर्व आरोपांना विरोधी पक्षांचा कट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार व्यतिरिक्त ट्रस्टने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही अहवाल पाठविला आहे. ज्यामध्ये जमीन खरेदीसंदर्भातील सर्व माहिती देण्यात आली आहे आणि किंमती कशा वेगळ्या आहेत हे स्पष्ट केले आहे.
ट्रस्टने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांकडून कथित जमीन घोटाळ्याचे आरोप लावले जात आहेत. विरोधकांनी केवळ दोन कोटी रुपयांची जमीन ट्रस्टने साडे १८ कोटी रुपयात विकत घेतल्याचा आरोप केला होता.
आज (मंगळवार) श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जमीन खरेदीसंदर्भात काही तथ्य प्रसिद्ध केले आहे. यामध्ये असा दावा केला गेला आहे की, जी जमीन घेतली आहे ती प्राइम लोकेशनवर आहे, म्हणून त्याची किंमत जास्त आहे. खरेदी केलेल्या जागेची किंमत प्रति चौरस फूट १४२३ आहे. या कराराबद्दल दहा वर्षे चर्चा चालू होती, ज्यामध्ये नऊ जणांचा सहभाग होता.
‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या दाव्यानुसार, राम जन्मभूमीलगत असणाऱ्या या जमिनीची १८ मार्च २०२१ रोजी खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आणि त्या वेळी जमिनीची किंमत २ कोटी दाखवण्यात आली. सपचे नेते पवन पांडे यांनी दोन मूळ मालकांची, तसेच दोन खरेदीदारांची नावे पत्रकार परिषदेत उघड केली. या खरेदीदारांनी ही जमीन ५.७ कोटी रुपयांना खरेदी केली. हा जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर दोन्ही खरेदीदारांनी पुढील १० मिनिटांमध्ये ही जमीन राम जन्मभूमी न्यासाला १८.५ कोटींना विकल्याचा दावाही या नेत्यांनी केला.