लखनौ : ११ जून – उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये गाझियाबादमधील डासना मंदिराचे महंत नरसिंहानंद यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. करोना साथीसंदर्भात भाष्य करताना करोना हे सरकारचं षडयंत्र असल्याचा दावा नरसिंहानंद यांनी केलाय. मास्क लावून लोकांना आजारी पाडलं जात आहे. मी स्वत: मास्क लावत नाही आणि करोना असल्याचंही मानत नाही, असं नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर त्यांनी भारतामध्ये मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हिंदूंच्या नाशाचं कारण ठरु शकते, असंही म्हटलं आहे.
महंत नरसिंहानंद एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मथुरेत पोहचले होते. इथे त्यांनी अनेक संतांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना करोनाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. “मास्क लावून तुम्हाला आजारी पाडलं जात आहे. करोना हे सरकारचं खूप मोठं षडयंत्र आहे. मी स्वत: मास्कही लावत नाही आणि करोनालाही मानत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे ते लोक मास्क लावतात,” असं महंत नरसिंहानंद म्हणाले.
गुरुवारी महंत नरसिंहानंद यांनी गोवर्धन परिक्रमा मार्गावरील रमणरेती आश्रमातील एका कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. या ठिकाणी बोलताना महंत नरसिंहानंद यांनी मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचं वक्तव्य केलं. जिथे जिथे मुस्लिमांची लोकसंख्या वाढलीय तिथे ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. लोकांनी हिंदू नेत्यांवर भरोसा ठेऊन नये, असंही महंत नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे. प्रत्येक हिंदूने कमीत कमी पाच ते सहा मुलांना जन्म दिला पाहिजे. ज्या पद्धतीने मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे ते पाहता मोठं संकट येत आहे. प्रत्येक हिंदूने शस्त्रधारी होणं गरजेचं आहे, असंही महंत नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे.
अशापद्धतीने करोनासंदर्भात विचित्र दावे करणारे महंत नरसिंहानंद हे काही पहिलेच धार्मिक व्यक्ती किंवा नेते नाहीत. यापूर्वीही अनेकांनी अशाप्रकारची विचित्र वक्तव्य केलेली आहेत. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी करोना आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी मोदी सरकारला दोष देणारं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संभलचे समाजवादी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनीही एक वादग्रस्त वक्तव्य करताना, करोना काही आजार नाहीय. करोना जर आजार असता तर जगात त्यावरील उपाय असता. करोेनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं अजाब ए इलाही (संकट) आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट संपेल, असं शफीकुर्र रहमान म्हणाले होते. यावरुनही चांगलाच वाद झालेला.