चंद्रपूर : १० जुन – मध्य चांदा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या राजुरा वनपरिक्षेत्रातील विहिरगाव उपक्षेत्र तथा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक १७२ मध्ये नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना काल रात्री उघडकीस आली. या परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचे मृतदेह आढळून येत असल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
नर वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असून, त्याचे सर्व अवयव कायम असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश गलगट यांनी दिली. या वाघाचा 4 ते 5 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज गलगट यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती कळताच उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहाय्यक वनसंरक्षक प्रितम कुमार कोडापे, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
मागील काही दिवसांपूर्वी या क्षेत्रात अस्वल मृतावस्थेत आढळून आली होती. सुमठाणा मार्गावर चितळाचा मृत्यू झाला. त्यामुळे वन्य जीवाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करणार्या वनकर्मचार्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नेफडो संस्थेचे बादल बेले यांनी केली आहे.