वीज कोसळल्याने २ महिला व एका पुरुषाचा मृत्यू

भंडारा : ९ जून – शेतात काम करीत असतांना वीज कोसळल्याने दोन महिला व एक पुरुष मजूराचा जागीच मृत्यू झाला. तर शेतकरी वडील व मुलगी जखमी झाली. सदर दुर्दैवी घटना मोहाडी तालुक्यातील खमारी/बु. येथे दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांची शेती मशागतीसाठी लगबग सुरू झाली आहे. आज मोहाडी तालुक्यातील खमारी/बु. येथील रतीराम उपराडे यांच्या शेतावर कामे सुरू असताना दुपारी अचानक वीज कोसळली. यावेळी मशागतीचे काम करीत असलेल्या महिला मजूर अनिता फत्त्तू सव्वालाखे (45), आशा शंकर दमाहे (45) व अशोक उपराडे (48) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जवळच असलेले शेतकरी रतीलाल उपराडे व त्यांची मुलगी पल्लवी उपराडे (19) हे गंभीर जखमी झाले. वीज कोसळल्याने मोठा आवाज होऊन जखमी वडीलांच्या व मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लगतच्या शेतशिवारातील शेतकरी व मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचाराकरिता नेले. मोहाडी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
हंगामाच्या सुरूवातीला निसर्गाने दाखविलेल्या प्रकोपामुळे गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने खमारी/बु. परिसरात शोककळा पसरली आहे. मृतकांच्या कुटुबियांना प्रशासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी व जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च प्रशासनाकडून करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply