मुंबई : ८ जून – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. या भेटीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टमंडळासोबत भेट घेतली. आम्हाला आनंद आहे की, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारसोबत किमान एक संवाद सुरू केला आणि निश्चतपणे संवादाचा फायदाच होत असतो. म्हणून या भेटीचं पहिल्यांदा मी स्वागत करतो.”असं देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीला सांगितलं.
तसेच, “या भेटीतील जे काही विषय आहेत, जवळपास ११ विषय या भेटीत आम्ही मांडले अशाप्रकारचं सांगण्यात आलं आहे. या ११ पैकी ८ ते ९ विषय असे आहेत, की जे पूर्णपणे राज्य सरकारच्या अख्त्यारितले आहेत. पण तरी देखील ते केंद्राकडे मांडण्यात आले. पण ठीक आहे, अपेक्षा असेल की केंद्राने काही अजून त्यात मदत करावी. केंद्र सरकारच्यावतीने ती निश्चतपणे मिळेल.” असंही फडणवीस म्हणाले.
“ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे. ते राजकीय आरक्षण देशाच्या इतर कुठल्याही राज्यात रद्द झालेलं नाही. देशातील प्रत्येक राज्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण सुरक्षित आहे. ते केवळ राज्यात रद्द झालेलं आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली कृती वेळेत न केल्यामुळे आणि जवळपास १५ महिने ही कृती न केल्यामुळे, खऱ्या अर्थाने हे ओबीसीचं राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रात रद्द झालं आहे. आताही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली कृती पूर्ण केली, तर किमान ५० टक्क्यांपर्यंतचं जे ओबीसींचं आरक्षण आहे ते निश्चितपणे बहाल होऊ शकतं. यामध्ये केंद्र सरकारची कुठली भूमिका आहे, असं मला तरी दिसत नाही.” असं देखील यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.