कुठेतरी राजकीय खिचडी शिजली हे नक्की – नवनीत राणा यांचा आरोप

अमरावती : ८ जून – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राणा यांची खासदारकी धोक्यात आली असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. यावर पत्रकार परिषद घेत नवनीत राणा यांनी मोठा खुलासा केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मी अद्याप वाचला नाही. पण यामध्ये पॉलिटिकल खिचडी शिजली असल्याचा धक्कादायक आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. कारण, अचानक कोर्टाचा असा निर्णय येणं म्हणजे कुठेतरी राजकीय खिचडी शिजली हे नक्की असं नवणीत राणा यांनी म्हटलं आहे.
गेली ९ वर्ष मी हा लढा लढत आहे. यामध्ये कोणी राजकारण केलं हे मला सांगण्याची गरज नाही. पण माझा आणि शिवसेनाचा हा वाद सगळ्यांनाच माहिती असल्याचं नवणीत राणा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर न्याय मागण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात जाईन. मला न्यायावर विश्वास आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
‘कोर्टाच्या निर्णयाचा मी आदर करते. मला न्यायालयाचा आदेश अद्याप वाचायचा आहे. गेली ८ वर्ष यावरून आम्ही भांडत आहोत. महिलेला खूप परिश्रम करावे लागतात. ते मी गेल्या ९ वर्षापासून केले आहेत. न्यायालयाने मला ६ आठवड्यांचा वेळ दिला आहे. कोणत्या कारणामुळे प्रमाणपत्र रद्द केलं. त्यावर मी अभ्यास करेन. मला न्यायावर आणि माझ्या कामावर विश्वास आहे’, असं राणा यांनी म्हटलं आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोरदेखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.

Leave a Reply