बुलडाणा : ७ जून – बुलडाणा जिल्ह्यात नातेसंबंधांना तडा देणारी आणखी एक घटना घडली आहे. शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील आकोली शिवारात घडली आहे. रमेश नरिभाऊ तिडके (वय-७०) असं मृत काकाचं नाव आहे.
मृत रमेश तिडके यांच्या मुलाच्या फिर्यादवरून हिवरखेड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पुतण्या पंकज सुरेश तिडके (वय-३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश तिडके (वय ७०) हे खामगाव तालुक्यातील अटाळी येथील रहिवासी आहेत. तिडके यांची आकोली शिवारात शेती आहे. या शेतीवरून त्यांचा आपल्या पुतण्याशी नेहमीच वाद होत असे. या वादातून काका-पुतण्यांनी यापूर्वीच परस्परांच्या विरोधात खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
काल (रविवारी) हे दोघेही शेतात होते. तिथं त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी पुतण्या पंकजने मृतक रमेश यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिवरखेडचे ठाणेदार ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी मृतकाच्या मुलाच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.