भंडारा : ७ जून – भंडारा जिल्ह्यातील सिलेगाव येथे महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यांच्यात तुफान हाणामारी पाहण्यास मिळाली. महिला सदस्यांनी महिला ग्रामसेविकेला मारहाण केली. घरकुल ठरावाच्या प्रोसिन्डिंग कॉपी मागण्यावरुन महिला सदस्यासह महिला सरपंच व ग्रामसेविका यांच्यात वाद झाला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथे घडली असून सिलेगाव ग्राम पंचायतीच्या दोन महिला सदस्यासह महिला सरपंच यांनी महिला ग्रामसेविकेला मारहाण केली.
सिलेगाव ग्रामपंचायत येथे शिवस्वराज दिनाच्या कार्यक्रम होता. त्या निमित्त कार्यक्रम आटोपल्यानंतर ग्रामसेविका मंजूषा सहारे व सरपंच संध्या पारधी यांच्यात घरकुल वाटपाचा ठरावावरून वाद होऊन प्रोसिडिंग कॉपी मागण्यावरुन महिला सरपंच संध्या पारधी व महिला ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्या वाद वाढला. त्यात सरपंच संध्या पारधी यांनी ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्याकडून प्रोसिडिंग कॉपी हिसकवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वाद आणखी चिघळला.
यावेळी ग्राम पंचायत महिला सदस्य महिला मनीषा राहंगडाले यांनी ग्रामसेविका यांना अपशब्द बोलल्याने महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यात तूफान तूफान हाणामारी झाली. सरपंच व इतर सदस्यांनी महिला ग्रामसेविका सहारे यांना मारहाण केली आणि प्रोसिंडिंग कॉपी हिसकावून नेली. हा वाद अखेर सिहोरा पोलिसात गेला असून तक्रार नोंदवण्यात आली आहे.