नातवाला बघण्यासाठी जाणाऱ्या आजी-आजोबांचा भीषण अपघातात मृत्यू

यवतमाळ : ७ जून – उमरखेड येथे नातवाला पाहण्यासाठी जात असलेल्या आजीआजोबांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना महागाव तालुक्यातील मुडाणा ते बिजोरा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. मोहन भागोजी टेकाळे (वय 50), अनसूया भागोजी टेकाळे (वय 48, रा. सवना) हे मृतक आहेत.
उमरखेड येथे सुनेची प्रसुती झाल्याने नातू पाहण्यासाठी दोघेही सवना येथून सकाळी उमरखेडकडे आपल्या क‘मांक एमएच29 बीजे3806 या दुचाकीने निघाले होते. मुडाणा ते बिजोरा रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. त्यात दोघेही जागीच ठार झाले. ही धडक एवढी भयंकर होती की, दोन्ही मृतकांचे शरीर छिन्नविछिन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. पोलिसांनी महामार्गावर नाकेबंदी करून त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते वाहन सापडले नाही. सवना ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात जमादार शरद येडतकर, नारायण पवार, गजानन राठोड करीत आहेत.

Leave a Reply