सलून व्यावसायिकांनी वर्धेत अडवला पालकमंत्र्यांच्या ताफा

वर्धा : ६ जून – सलून व्यवसायिकांनी राज्याचे पशुसनवर्धन मंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांचा ताफा वाटेतच अडवला. विशेष म्हणजे सुनील केदार यांनीही गाडीतून खाली उतरून सलून व्यवसायिकांशी चर्चा केली. तसेच, त्यांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा करतो, असे सांगितले.
सुनील केदार नागपूरहुन वर्ध्याला येत होते. तेव्हा सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलकांनी पवनार गावाजवळ सुनील केदार यांचा ताफा अडवला. तर, आंदोलकांच्या भूमिका समजून घेण्यासाठी सुनील केदार यांनी वाहनातून उतरून चर्चा केली.
यावेळी ‘आत्महत्याग्रस्त सलून दुकानदारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी. सलून ब्युटी पार्लर दुकानदार, कारागिरांना स्वतंत्र पॅकेज देत महिन्याला 7 हजार रुपये द्यावेत. लॉकडाऊन काळातील दुकानभाडे, वीज बिल माफ करावे. सुरक्षा विमा कवच द्यावे. प्राधान्याने लस द्यावी’, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.
चर्चेनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. अचानक ताफा अडवल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला. पण पालकमंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करताना हा विषय माझा खात्याशी संबंधित नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सूचना देतो, असे सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेतही सलून व्यवसायिकांना उशिरा दुकाने खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यावेळीही आक्रमक होत त्यांनी आंदोलन केले होते.

Leave a Reply