संपादकीय संवाद – देवेंद्र फडणवीसांनी आता पुन्हा अशी चूक करू नये

नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवारांसोबत सकाळी ८ वाजता उरकलेला शपथविधी ही चूक होती अशी कबुली माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत दिल्याचे वृत्त आहे. अर्थात असे केल्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीत असे पाऊल उचलावे लागल्याचेही फडणवीसांनी सांगतांना या प्रकरणात आपल्याबद्दलच्या विश्वासार्हतेला कुठेतरी तडा गेला असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे.
उशिरा का होईना पण फडणवीसांनी हे मान्य केले हे बरे झाले,त्यांचे हे पाऊल त्यावेळी बरेच वादग्रस्त ठरले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे काही घडले ते सर्व चुकीचेच होते. चुका करायला सुरुवात शिवसेनेने केली. भाजपला कमी जागा मिळाल्या आहेत हे बघून उद्धवपंतांनी नाटके सुरु केली. बाळासाहेबांच्या खोलीत वाचन दिल्याचे चित्र निर्माण करीत युतीपासून दूर जाण्याचा पवित्रा त्यांनी घेतला ज्या शरद पवारांना आणि काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर शिव्या दिल्या होत्या त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर त्यांनी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरु केला तिथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. पुढे काय घडले हे फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर उभा भारत जाणतो.
राजकारणात काहीही अशक्य नसते असे म्हटले जात असले तरी अचानक अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणे हे कुठेतरी चुकीचेच होते. याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे घेऊन भाजपने २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका लढवल्या होत्या अजित पवारांच्या कथित भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे पुढे करत भाजपने आपल्या सत्ताकाळात काही राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध कारवाईही सुरु केली होती. छगन भुजबळांना पुतण्यासह तुरुंगात डांबले होते. प्रसंगी अजित पवारांनाही तुरुंगात डांबण्याची तयारी केल्याचीही माहिती होती. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांविरुद्ध बैलगाडीभर पुरावे देऊ सिंचन घोटाळ्याविरुद्ध कंठशोष केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर अचानक अजित पवारांबरोबर शपथविधी उरकणे हे सर्वानाच खटकणारे होते. त्यातही हे सरकार टिकले असते तर वेगळे मात्र, हे सरकार ३ दिवसही टिकले नाही त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे टीकेचे लक्ष्य ठरले होते.
आजही कोरोनाची साथ संपली की मी या महाआघाडी सरकारचा कार्यक्रम करतो असा दावा देवेंद्र फडणवीस करत आहेत त्यांनी हा कार्यक्रम जरूर करावा मात्र २०१९ मध्ये केलेली चूक पुन्हा करू नये ही त्यांच्या चाहत्यांची आणि भाजप समर्थकांची मनोमन इच्छा आहे. ज्या शिवसेनेने त्यांना दगा दिला त्या शिवसेनेसोबत किंवा ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सत्तेत येऊ नये म्हणून अनैतिक खेळी खेळली त्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांनी पुन्हा हातमिळवणी करून सरकारमध्ये येऊ नये तसे केल्यास त्यांच्या विश्वसार्हतेबद्दल पुन्हा नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण होईल. हे निश्चित. त्यामुळे असा गाढवपणा पुन्हा केला जाऊ नये तशीच वेळ आल्यास महाराष्ट्रात काही काळ राष्ट्रपती राजवट लावावी आणि नंतर भाजपने मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे महाराष्ट्राची जनता त्यांना निश्चित साथ देईल याची खात्री बाळगावी.

अविनाश पाठक

Leave a Reply