अनमोल भेट
काही दिवसांपासून एक छोटीशी ४-५ वर्षांची गोड मुलगी फुलं गोळा करायला येतेय . खाली चाफ्याची खूप फुलं पडतात ती वेचायला येते . कधी कधी कोमेजलेली फुलं पण गोळा करते . तिला म्हटलं ताजी फुलं घेत जा. ह्यांनी जरा खाली लागलेली फुलं तोडून दिली. बरं बोलत काहीच नाही . काही विचारलं तर समजतय सगळं पण बोलत नाही. आज खाली चांगली फुलं नव्हती तर गच्चीवर जाऊन ताजी फुलं आणून दिली. थोड्या वेळाने आली आणि ह्यांच्या हातात एक फूल त्यावर काँग्रेस गवताचा तुरा , फुलात छोटी फुलं असं आणून दिलं . (फोटो ). मला एवढं गहिंवरुन आलं . या पेक्षा या घटकेला precious आमच्यासाठी काय असणार ? किती कृतज्ञता असावी ! आपणही काही दिलं पाहिजे ही भावनाच महत्वाची नाही कां ? बाळा ! अशीच निरागस रहा . मोठी झाल्यावर विखार विद्वेषाचा स्पर्शही न होवो तुला.
आताच्या काळात असे प्रशंसेचे क्षण लाभणं मनाला उभारी देतात नाही कां ?
एक १०-१२ वर्षांची मुलगी रोज सकाळी सायकल चालवते घरासमोर . एक दिवस क्षणभर थांबली आणि ह्यांना म्हणाली ” अंकल तुम्ही माऊथ आॕर्गन छान वाजवता ” आणि पटकन निघून गेली . दुसऱ्या दिवशी हे तिला म्हणाले बेटा ! मला अंकल नको म्हणू . माझा नातू तुझ्यापेक्षा बराच मोठा आहे. मला आजोबा, आबा काही म्हण. त्या दिवसापासून सकाळी आजोबा-आजीला शुभेच्छा देऊनच पुढे जाते.
या क्षणाला पैसा , संपत्ती सगळं गौण आहे नाही कां ? आता हवे ते आपुलकीचे दोन क्षण, आपली कुणी दखल घेतं हेच मनाला उभारी देऊन जातं .
आज मन फार हळवं झालयं . खरं तर या वर्षभराच्या काळात जे पुढे आलं त्याला तोंड द्यायचं हेच मनाशी घोकत आले. मन खंबीर ठेवलं पण आज चिमुकलीच्या सुंदर भेटीने मनाचा बांध फुटला.
परमेश्वरा ! एकटेपणा आलेल्यांच्या जीवनात उमेद जागवण्यासाठी असे अनमोल क्षण अधूनमधून पेरत रहा .
सौ. अमृता खोलकुटे