घ्या समजून राजेहो …. मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य केव्हाही चांगले हे लक्षात घ्या नानाभाऊ!

एका काळात संपूर्ण देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाची आज अतिशय दयनीय अवस्था आहे. ज्या महाराष्ट्रात काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांचाही दबदबा असायचा त्या काँग्रेस पक्षाच्या एका मंत्र्याला आज काँग्रेसच्या जीवावर सत्ता उपभोगत असलेल्या अर्धवट प्रादेशिक पक्षाचा मुख्यमंत्री चक्क तोंडघशी पाडतो आणि ते तुम्हाला बघत असताना हात चोळण्यापलीकडे काहीही करता येत नाही. आणि हे सर्व तुम्ही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना घडते आहे नानाभाऊ. तुमच्यासारखा प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिंगावर घेणारा दबंग नेता हे का सहन करतो आहे? हा आम्हाला प्रश्न भेडसावतो आहे. म्हणूनच आज माझ्यासारखे तुमचे असंख्य हितचिंतक एकच सल्ला मनोमन देत आहेत, नानाभाऊ आता तुम्ही तुमच्या पक्षासह महाआघाडी सरकारमधून ताबडतोब बाहेर पडा.
नानाभाऊ तुमच्या काँग्रेस पक्षाने साथ दिली नसती तर महाराष्ट्रात महाआघाडी सरकार सत्तेत आलेच नसते. उद्धवपंत ठाकरेंना कसेही करून मुख्यमंत्री पदाचे कुंकू भाळी लावून घ्यायचे होते. तर शरद पवारांना कसेही करून देवेंद्र फडणवीसांची खुमखुमी जिरवयाची होती. त्यामुळे ते दोघेही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार बसले होते. प्रश्न तुमचाच होता, तुमचे पक्षश्रेष्ठी त्यावेळी तयार नव्हते. तेव्हा हेच ठाकरे आणि पवार सोनियाजींच्या आणि राहुलजींच्या नाकदुऱ्या काढत फिरत होते. तुमच्या महाराष्ट्रातील तत्कालीन नेत्यांनीही विचार केला की ५ वर्ष सत्तेपासून दूर राहिल्यावर पुन्हा जी काही सत्ता मिळते ती उपभोगावी आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवल्याचे पुण्यकर्म करावे मात्र या पुण्याचे फळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याखालोखाल शिवसेना मिळवते आहे, तुमच्या नशिबी मात्र तपश्चर्या आणि जनतेचे शिव्या शापच आले आहे. हे किती दिवस चालवणार नानाभाऊ?
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे अगदी कालपरवा झालेला वडेट्टीवारांचा प्रसंग, वडेट्टीवार मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत त्यामुळे लॉक डाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमध्ये पीडितांना मदत करणे आणि प्रसंगी त्यांचे पुनर्वसन करणे हे काम वडेट्टीवारांकडेच येते. विजुभाऊ वडेट्टीवार हादेखील तुमच्याचसारखा वैदर्भीय बाणा जपणारा दबंग वऱ्हाडी माणूस आहे. कोणतेही काम झोकून करणारे विजूभाऊ मागचा पुढचा विचार करत नाहीत. उत्साहाच्या भरात त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीतील निर्णय करून टाकले जाहीर, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांभाळून घ्यायला नको का? त्यांचे सरकारच तुमच्यामुळे सांभाळले गेले आहे. हे ते विसरतात आणि चक्क तुमच्याच मंत्र्याला तोंडघशी पडतात. हा फक्त विजुभाऊंचाच नव्हे तर तुमचा काँग्रेस पक्षाचा आणि संपूर्ण विदर्भाचाही अपमान आहे ना? मग अजूनपर्यंत तुमचे रक्त कसे उसळले नाही?
विजूभाऊंनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊन मुक्तीची घोषणा केली तो त्यांच्याच खात्याचा प्रश्न होता. आता राजेश टोपे मुख्यमंत्र्यांना बाजूला ठेऊन माध्यमांशी बोलतातच ना? ते उद्धव पंतांना चालते चालले नाही तरीही सिल्व्हर ओक वरून दम भरला गेला की गप्प बसावे लागते. मग वडेट्टीवार आपल्या खात्याबद्दल बोलले तर उद्धव पंतांना मिरच्या इतक्या का झोंबाव्या? विजूभाऊंच्या पत्रपरिषदेनंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचा खुलासा करावा आणि नंतर २८ तासांनी काहीही बदल न करता तीच घोषणा पुन्हा करावी, हे अतीच होते आहे ना नानाभाऊ.
आता ही काही महाआघाडीच्या नेत्यांची पहिलीच आगळीक नाही वारंवार तुमच्या पक्षाला आणि तुमच्या मंत्र्यांना कमी लेखण्याचाच प्रयत्न केला जातो आहे. विजूभाऊंची केली तशीच गोची नितीन राऊतांचीही केली होती. पहिल्या लॉक डाऊन नंतर त्यांनी शंभर युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याची घोषणा केली होती. अजित पवारांनी त्यांना तोंडघशी पाडले आता नुकतेच ओबीसी अधिकाऱ्यांच्या आरक्षण प्रकरणीही नितीन राऊतांना अजितदादा आणि उद्धव पंतांनी चूप बसवले. नितीन राऊत हेदेखील तुमच्याचसारखे नागपुरी दबंग आहेत. त्यांची वारंवार गोची झाली तर ते प्रसंगी सर्वांचीच गोची करतील हा धोकाही लक्षात घ्या ना. शिवसेनेच्या मंत्र्याकडे असलेली एसटी तोट्यात गेली म्हणून तातडीने शासकीय निधी एसटी कडे वळवला जातो आणि काँग्रेसकडे असलेल्या ऊर्जामंत्रालयाला कायम ठेंगा दाखवला जातो, हे कितपत योग्य आहे.
महाआघाडीचे गठन करताना जो किमान सामान कार्यक्रम ठरला होता त्या कार्यक्रमातील काँग्रेसच्या कलमांनाही ठाकरे सरकार कायम वाटाण्याच्या अक्षता लावते आहे. या प्रकरणाची दखल शेवटी सोनीजींना घ्यावी लागली. त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले ते पत्र घेऊन तुमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटले. मात्र त्या पत्रालाही केराची टोपलीच दाखवण्यात आली. तुमच्या नेत्यांचा असा अपमान तुम्ही कसा सहन करता नानाभाऊ?
अजून एक तर राहिलेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी एकत्र येत तुम्हाला मंत्री होऊ दिले नाही आणि दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष केले हा इतिहास तुम्ही डोळ्याआड केला असेलही, मात्र माझ्यासारखे तुमचे हितचिंतक अजून विसरलेले नाहीत आज तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते पद सोडले तुमच्यानंतर त्या जागेवर पृथ्वीराजबाबा चव्हाणांचे नाव होते. पृथ्वीराजबाबा शरद पवारांना चालत नाहीत त्यामुळे ती जागा आजही रिक्तच ठेवलेली आहे. हा तुमच्या पक्षावर अन्याय नाही का?
२०१९ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तुमचे तत्कालिन नेते महाआघाडीत सहभागी झाले. मात्र तुमच्या हातात धुपाटणेच आले आहे. सर्व मलईदार खाती राष्ट्रवादी आणि शिवसेनेने वाटून घेतली उरलेला गाळ तुमच्या वाटेल दिला. तुमच्या आमदारांना पुरेसा निधीही देत नाही . तुमची कामेही होत नाहीत तरीही तुम्हाला फरफटत जावे लागते.

या सर्व प्रकारात तुमचे आमदार आणि कार्यकर्तेही नाराज झाले आहेतच पण तुमचे असंख्य हितचिंतकही दुखावले आहेत. ज्या शिवसेनेने काँग्रेसला कायम शिव्याच दिल्या त्या शिवसेनेसोबत सत्तेसाठी लाचार होऊन फरफटत जाणे हे तुमच्या हितचिंतकांना मान्य नाही काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रला यशवंतराव चव्हाणांपासून तर पृथ्वीराज चव्हानांपर्यंत दबंग मुख्यमंत्री दिले आहेत. आज मुख्यमंत्री पदाशिवाय सत्तेतील सहभाग आणि त्यातही इतर दोन मित्र पक्षांनी मारलेल्या लाथा ही तुमची शुद्ध लाचारी असल्याचे मत तुमचे हितचिंतक खासगीतं व्यक्त करतात. मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य केव्हाही चांगले असे पूर्वसुरींनी लिहून ठेवले आहे. आजचा काँग्रेसचा सत्तेतील सहभाग हा मिळमिळीत सौभाग्यासारखाच आहे त्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा उद्या तोडजोड करून सरकार स्थापन झाले तर आक्रमक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही जास्त चांगले काम करू शकाल जर मध्यावधी निवडणुका झाल्याचं तर सत्तेसाठी लाचारी न पत्करता बाहेर पडलेला बाणेदार पक्ष म्हणून जनताही तुम्हाला साथ देईल हे निश्चित.
म्हणूनच सांगतो नानाभाऊ, तुमच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत इतिहास घडवा काँग्रेस पक्ष आणि आमच्या सहकाऱ्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा करीत असलेला खेळखंडोबा आम्ही चालू देणार नाही असे सांगून काँग्रेस पक्षाला महाआघाडीतून बाहेर काढण्याचा दबंगपणा तुम्ही दाखवा हे काम करण्याची हिम्मत आज फक्त तुमच्यातच आहे.
गेल्या आठवड्यात एका सभेत बोलतांना तुम्ही २०२४ मध्ये काँग्रेस महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येईल असे भाकीत केले होते. हे अशक्य नाही मात्र त्यासाठी तुम्हाला बाणेदारपणा दाखवावा लागेल आणि सत्तेतून बाहेर पडावे लागेल.
त्यासाठी माझ्यासारखे तुमचे असंख्य हितचिंतक आतुरतेने वाट बघत आहेत.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

Leave a Reply